Sun, Jul 21, 2019 10:18होमपेज › Pune › भंडार्‍यामुळे महापौर निवडणुकीचे कवित्व सुरूच

भंडार्‍यामुळे महापौर निवडणुकीचे कवित्व सुरूच

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 12:01AMपिंपरी ः नंदकुमार सातुर्डेकर

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेतील पाणीपुरवठा विभागास टाळे ठोकून केलेले आंदोलन, मागील वेळेप्रमाणे घुमजाव न करता लढवलेली महापौर निवडणूक, या निवडणुकीनंतरच्या जल्लोषात भाजपने उधळलेल्या भंडार्‍यावरून घसरून झालेले अपघात, पाणी आंदोलन व भंडाराप्रकरणी गुन्हे दाखल करताना झालेल्या पक्षपातीपणावर राष्ट्रवादीने ठेवलेले बोट, यामुळे महापौर निवडणुकीचे कवित्व अजून सुरूच आहे  

पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याप्रकरणी राष्ट्रवादीने पाणीपुरवठा विभागाला टाळे ठोकून आंदोलन केले. याप्रकरणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह  मयूर कलाटे, समीर मासुळकर, डॉ. वैशाली घोडेकर, गीता मंचरकर, सुलक्षणा धर, वैशाली काळभोर, पौर्णिमा सोनवणे, जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे, अपर्णा डोके या राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांवर विनापरवाना जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

याच दरम्यान महापौर निवडणूक झाली.  पालिकेच्या निवडणुकीनंतर झालेल्या महापौर निवडणुकीत माघार घेतलेल्या राष्ट्रवादीने या वेळी मात्र निवडणूक लढवली. महापौर निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव 80 मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना 33 मते पडली.  राष्ट्रवादी लढल्याने काही गोष्टी  उघड झाल्या. महापौरपदासाठी तीव्र इच्छुक असलेल्या शत्रुघन काटे, तसेच युवा मोर्चाचे रवी लांडगे यांची अनुपस्थिती जाणवण्यासारखी होती. मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला केलेलेे मतदान व त्याच्या समर्थनार्थ केलेला युक्‍तिवाद याचीही चर्चा झाली.

उपमहापौरपदासाठी भाजपचे सचिन चिंचवडे यांना 79, तर राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांना 33 मते मिळाली. राष्ट्रवादीचे रोहित काटे  तटस्थ राहिल्याने त्याची चर्चा होती.महापौर जाधव यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी पालिका आवारात व इमारतीत भंडार्‍याची उधळण केली. त्यातच पावसाने चिखल झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले. अग्निशामक दलाला बोलावून परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्याची वेळ पालिकेवर आली. पालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

राष्ट्रवादीचे पाणी आंदोलन व भाजपचे भांडारा प्रकरण याचा उल्लेख करत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी हल्लाबोल केला. विरोधकांवर दखलपात्र, तर सत्ताधार्‍यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल करून आयुक्‍त व पोलिस पक्षपातीपणा करत असल्याचे  त्यांनी सांगितले. आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी मात्र कारवाईत भेदाभेद केला जात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला.

राष्ट्रवादीने पाणीपुरवठा विभागास टाळे ठोकून आंदोलन केले. त्यावेळी बंदोबस्तासाठी आम्ही पोलिस बोलावले. घटना पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरण पाहून पोलिस त्यांची नावे निश्चित करतील, कलम लावतील. कोणते कलम लावायचे  हे मी ठरवत नाही. महापौर निवडणुकीच्या वेळी भंडारा उधळल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी पोलिसात तक्रार दिली असल्याचे आयुक्‍तांनी सांगितले. थोडक्यात या ना त्या कारणाने महापौर निवडणुकीचे कवित्व अद्याप कायम आहे.