Sat, Dec 14, 2019 02:15होमपेज › Pune › धक्कादायक; डब्यात विष टाकून मुलाला मारण्याचा प्रयत्न

धक्कादायक; डब्यात विष टाकून मुलाला मारण्याचा प्रयत्न

Published On: Dec 23 2017 2:29AM | Last Updated: Dec 23 2017 2:29AM

बुकमार्क करा

वडगाव मावळ : वार्ताहर 

अनसुटे (ता. मावळ) येथे अंगणवाडीच्या विद्यार्थ्याच्या जेवणाच्या डब्यात थायमीठ (पिकाच्या वाढीसाठी वापर) हे विष टाकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.22) घडला.  परंतु अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रसंगावधानाने या चिमुरड्याचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजता अंगणवाडी सेविका हिरा किसन लष्करी व मदतनीस शोभा गबाजी  गायकवाड यांनी मुलांना माध्यान्ह भोजनासाठी वर्गात मसालेभात खायला दिला.

मुलांनी तो खायला सुरुवात केली होती. याच सुमारास येथील घाग परिवाराचा जावई सहादू धोंडिबा टेमगिरे हा त्याच्या लहान मुलीस घेऊन वर्गात आला. माझ्या मुलीलाही मसालेभात वाढा, असे सांगितले. त्यानुसार मदतनीस गायकवाड यांनी त्या मुलीलाही मसालेभात दिला. ही मुलगी भात खात असताना टेमगिरे याने तिला पाणी प्यायचे आहे, असे सांगून वर्गातील सार्थक चिंतामण मोरमारे (वय 4) याच्याकडील पाण्याची बाटली घेतली. काही वेळाने वर्गात गॅससारखा उग्र वास आल्याचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाणवले. त्यांना संशय आल्याने दोघींनी गॅस सिलिंडर तपासला; मात्र हा वास गॅसचा नसून थायमीठचा असल्याचे जाणवल्याने त्यांनी सार्थकसह सर्व मुलांचे जेवणाचे डबे तपासले.

कारण टेमगिरेने सार्थकला आल्यावर ओळख देऊन पाण्याची बाटली उचलली होती. सार्थकच्या डब्यातील मसालेभात काळा पडला होता. सार्थक तुझ्या डब्यात हे कोणी टाकले, असे अंगणवाडीताईंनी त्यास विचारले असता, त्याने टेमगिरेकडे बोट दाखवले. याबाबत विचारले असता टेमगिरेने उडवाउडवीची उत्तरे दिली. टेमगिरेनेच सार्थकच्या डब्यात थायमीठ टाकलेले लक्षात येताच अंगणवाडी कर्मचार्‍यांनी गावकर्‍यांना बोलावले.गावकर्‍यांनी टेमगिरेस जाब विचारताच उडवाउडवीची उत्तरे देत त्याने तेथून धूम ठोकली. या घटनेची तक्रार अंगणवाडी सेविका हिरा लष्करी यांनी  वडगाव मावळ पोलिसांत दिली असून, टेमगिरेवर चिमुरड्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   पोलिस निरीक्षक प्रदीप काळे व सहायक निरीक्षक गणेश लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कर्डिले, होमगार्ड सुरेश शिंदे यांनी सहादू टेमगिरे यास रात्री उशिरा अटक केली.