वडगाव मावळ : वार्ताहर
मावळ तालुक्यात ‘एक बूथ 50 यूथ’ ही संकल्पना पूर्ण केली तर सुमारे 17 हजार कार्यकर्ते सक्रिय होतील, हा प्रयत्न यशस्वी झाला तर पुढची 25 वर्षे मावळात भाजपला कोणी धक्का लावू शकणार नाही, असा विश्वास जिल्हाध्यक्ष आमदार संजय भेगडे यांनी व्यक्त केला.
वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्समध्ये मावळ विधानसभा बुथ प्रमुख व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे पर्यटन संघटक रवी अनासपुरे उपस्थित होते.
याप्रसंगी, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, महिलाध्यक्षा नंदाताई सातकर, युवती अध्यक्षा राणी म्हाळसकर, बाबा शेट्टी, गणेश भेगडे, जितेंद्र बोत्रे, जिजाबाई पोटफोडे, सुवर्णा कुंभार, ज्योती शिंदे आदि उपस्थित होते.
आमदार भेगडे यांनी पुढे बोलताना, मावळ तालुक्यासारखं पक्षसंघटन राज्यात कुठेही नसल्याचा दावा करुन याची दखल राज्य पातळीवरील नेतेही वेळोवेळी घेतात असे सांगितले. तसेच, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद, कॅन्टोमेंट बोर्ड अशी सगळी सत्तास्थाने ताब्यात असलेला हा एकमेव तालुका असल्याचे सांगून 340 बुथ द्वारे प्रत्येकी 50 कार्यकर्ते सक्रिय झाल्यास कार्यकर्ता संघटन उत्कृष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला.
रवी अनासपुरे यांनी केंद्र व राज्य सरकारने अंमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती देवून संबंधित सर्व योजना ह्या ‘मोबाईल अॅप’द्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले, समाजातील शेवटच्या घटकाची उन्नती हेच आपल्या यशाचे द्योतक असल्याचे मत व्यक्त केले.
‘पवना जलवाहिनी होवू देणार नाही’
दरम्यान, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पवना जलवाहिनी संबंधित याचिका फेटाळल्याने तालुक्यात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न सुरु आहे; परंतु काहीही झाले तरी कोणत्याही परिस्थितीत मावळ भाजप पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प होवू देणार नाही, असे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे यांनी स्पष्ट केले.