Sun, Feb 17, 2019 09:01होमपेज › Pune › माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 05 2018 12:42AMआळंदी : वार्ताहर

संपत्ती सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ॥ 

असे म्हणत राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले असून, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 187व्या पायी वारी पालखी सोहळ्याचे ज्येष्ठ वद्य अष्टमी म्हणजेच शुक्रवारी (दि. 6) दुपारी चारच्या दरम्यान प्रस्थान होणार असून, या प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रस्थान दिवशी पहाटे पावणेतीन ते साडेचार घंटानाद,  काकडा आरती व पवमान अभिषेक होईल. साडेचार ते दुपारी बारा भाविकांच्या महापूजा व समाधी दर्शन, दुपारी बारा ते साडेबारा ‘श्रीं’ना नैवेद्य आणि भाविकांना दर्शन बंद करण्यात येईल. दुपारी साडेबारा ते दोन भाविकांना पुन्हा समाधी दर्शन खुले होईल. दुपारी दोननंतर प्रस्थान कार्यक्रमासाठी देऊळवाडा स्वच्छ करण्यात येईल.  

साडेतीनच्या दरम्यान प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47  दिंड्यांना मंदिरात प्रवेश देतील. या दरम्यान माऊलींना पोशाख चढविण्यात येईल. दुपारी चारनंतर पालखी प्रस्थानासाठी गुरू हैबतबाबा यांचे वतीने परंपरागत मानाची आरती होईल.  गुरू हैबतबाबांच्या वतीने नारळ प्रसाद दिला जाईल. त्यांनतर माउलींची पालखी आळंदीकर मंडपाबाहेर आणून मंदिर प्रदक्षिणा करून देऊळ वाड्यातून बाहेर आणली जाईल. समाज आरती होत पालखी नवीन दर्शन बारी मंडपात (गांधीवाडा) विसावेल.  शनिवारी (दि. 7) पालखी पुण्याकडे मार्गस्थ होईल.