होमपेज › Pune › पुण्यात विसावली माउलींची पालखी

पुण्यात विसावली माउलींची पालखी

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 1:41AM



आळंदी :  श्रीकांत बोरावके

तुला साद आली 
तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भीमेची, निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी ।

माहेरघराचा निरोप घेत माउलींची पालखी शनिवारी (दि. 7) सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमरास पुण्याकडे मार्गस्थ झाली. या वेळी सर्व आळंदीकर माउलींना निरोप देताना भारावले होते. 15 ते 20 दिवसांचा दुरावा ठेवत माउली पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

माउलींची साद घेत वाहत असणारी इंद्रायणी चंद्रभागेला गळाभेट घेण्यासाठी जोरदारपणे वाहत असल्याचे काहीसे चित्र होते. हरिनामाच्या गजरात शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पालखीचे प्रस्थान झाले होते. तद्नंंतर ती पहिल्या मुक्कामासाठी जुन्या गांधी वाडा आजोळघराच्या व आत्ताच्या नवीन दर्शनबारी मंडपात दाखल झाली होती. शनिवारी सकाळी नित्य धार्मिक विधी उरकत शितोळे सरकार यांच्या वतीने नैवेद्य दाखविल्यानंतर पालखी सव्वा सहाच्या सुमारास पुण्याकडे मार्गस्थ झाली. या वेळी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी वारकर्‍यांसाठी पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी चहा, नाष्टा व फळे मोफत उपलब्ध करून देत वारीत आपला सहभाग नोंदवला.

सकाळी आठच्या सुमारास पालखी विसाव्यासाठी थोरल्या पादुका मंदिर, भोसरी फाटा साईमंदिर येथे विसावली. येथे समाज आरती घेण्यात आली. तद्नंतर पालखी दुपारच्या विसाव्यासाठी फुलेनगरकडे रवाना झाली. 

चर्‍होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, दिघी मँगझिन, साई मंदिर आदी भागातील नागरिकांसह पंचक्रोशीतील मोशी, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, केळगाव, मरकळ, सोळु, धानोरे, गोलेगाव आदी गावांतून नागरिक माउलींना निरोप द्यायला पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पोलिसांच्या वतीने पालखी मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जशी जशी पालखी पुढे मार्गस्थ होत होती तशी मागील मागील रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जात होते. 

पेरणी लांबल्याने यंदा वारकर्‍यांची संख्या कमी असल्याने रस्ते लगेच वाहतुकीसाठी मोकळे होत होते. दरम्यान, सकाळीच पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या सरीत भिजतच पालखी सकाळच्या विसाव्याच्या ठिकाणी पोहोचली.