होमपेज › Pune › माऊलींच्या पादुकांचे निरेत शाही स्नान  

माऊलींच्या पादुकांचे निरेत शाही स्नान  

Published On: Jul 13 2018 7:06PM | Last Updated: Jul 13 2018 7:06PMनिरा : प्रतिनिधी 

टाळ-मृदंगाचा गजर, पताका घेतलेला वैष्णवांचा मेळा आणि मुखी विठ्ठलनामाचा जयघोष करीत, चैतन्यमय वातावरणात पावसाच्या हजेरीत असंख्य भाविकांच्या उपस्थितीत निरा नदीतील पाण्याने संत शिरोमणी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पादुकांना  दत्तघाटावर आज, शुक्रवारी (दि. 13) दुपारी दोन वाजता शाही स्नान घालण्यात आले. त्यानंतर माऊलींच्या पालखीने  पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. 

वारीची परंपरा सुरू करणार्‍या हैबतबाबांच्या जन्मभूमीत जन्मलेल्या भाविकांनी माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. वाल्हे येथून शुक्रवारी (दि. 13) सकाळी साडेसहा वाजता पालखीचे पुढील प्रवासासाठी प्रस्थान झाले. सकाळी सव्वानऊ वाजता पिंपरे खुर्द येथील सकाळची न्याहारी घेऊन दुपारचा नैवेद्य व विसाव्यासाठी निरा गावात पालखी सोहळ्याने 11 वाजता प्रवेश केला. यावेळी शिवाजी चौकात निरेचे सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, दत्ता चव्हाण, गोरखनाथ माने, अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, चंदरराव धायगुडे, दीपक काकडे, विजय शिंदे, ग्रामसेवक सुभाष लिंबरकर यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे वाद्यांच्या गजरात उत्साहात स्वागत केले. 

पालखी सोहळा दुपारच्या विसाव्याकरिता निरा नदीकाठावरील पालखीतळावर विसावला. यावेळी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. निरा भिवरा पडता दृष्टी ।स्नान करिता शुद्धी सृष्टी ॥अंति तो वैकुंठ प्राप्ती।ऐसे परमेहि बोलले ॥श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये इंद्रायणी, निरा, चंद्रभागा तीरावरील स्नानाला अधिक महत्व आहे. सुरूवातीला माऊलींच्या पादुकांना इंद्रायणीच्या पवित्र तीर्थाने स्नान घालण्यात येते. त्यानंतर संपूर्ण सोहळ्याच्या वाटचालीत निरा येथे नदीच्या तीर्थात श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना पहिले शाही स्नान घालण्याची परंपरा आहे. 

निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माऊलींचा रथ दत्त मंदिरासमोर आल्यानंतर माऊलींच्या पादुकांना रथामधून बाहेर घेऊन सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर  यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. या वेळी पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. विकास ढगे, विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी, अभय टिळक, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार आदींच्या उपस्थितीत माऊलीच्या जयघोषात व टाळमृदंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर भक्तिमय वातावरणात शाही स्नान घालण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पादुका स्नानानंतर पालखी सोहळ्याचे स्वागत साताराचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, साताराचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव आदींनी स्वागत केले.