होमपेज › Pune › काँग्रेसमध्ये प्रवेशाचा दाभाडेंचा गौप्यस्फोट

काँग्रेसमध्ये प्रवेशाचा दाभाडेंचा गौप्यस्फोट

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:38AMवडगाव मावळ : वार्ताहर

मावळ तालुक्यातील सहकारमहर्षी म्हणून ओळख असणारे अजित पवारांचे कट्टर समर्थक माऊली दाभाडे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा गौप्यस्पोट आज दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला असून मावळ तालुक काँग्रेसनेही दाभाडे यांच्या पक्ष प्रवेशास काँग्रेसच्या बैठकीमध्ये एकमत झाले असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, कार्याध्यक्ष खंडूजी तिकोणे यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकामध्ये ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित असून यासंदर्भात काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली होती. 

या बैठकीमध्ये दाभाडे यांच्या प्रवेशाचे स्वागत करण्याचा निर्णय घेऊन दाभाडे यांच्या प्रवेशासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहारही करण्यात आला असल्याचे सातकर व ढोरे यांनी सांगितले. दाभाडे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला चांगले दिवस येणार असल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. गतवर्षी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून राष्ट्रवादीने दाभाडे यांच्यासह काही पदाधिकार्‍यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले होते. यानंतर दाभाडे यांनी नाराज कार्यकर्त्यांची मूठ बांधून राष्ट्रवादीला समांतर संघटना उभी करण्याच्या उद्देशाने समांतर राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा केली होती. परंतु, तालुक्यातून भाजपाला हद्दपार करायचे असेल व राष्ट्रवादीला धडा शिकवायचा असेल तर ठोस भूमिका घेणे आवश्यक असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला व काँग्रेसच्या राज्यपातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी बोलणी सुरू केल्याचे दाभाडे यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बोलणी झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा आग्रहही धरला आहे व याबाबत त्यांनीही योग्य प्रतिसाद दिला असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. काँग्रेस प्रवेशासंदर्भात 4 मार्चला प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बहुतांश पदाधिकार्‍यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारीही दर्शविली आहे. तर काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्येही दाभाडे यांचा प्रवेश पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय असल्याने प्रवेशाबाबत एकमत झाले आहे.

जिल्ह्यातही राष्ट्रवादीला सुरुंग लावणार : दाभाडे

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे  जिल्ह्यातील सर्व  तालुक्यांतील नाराज नेते व पदाधिकार्‍यांना एकत्र करून त्यांचाही काँगे्रसमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचा इशारा दाभाडे यांनी या वेळी दिला.