Wed, Jul 17, 2019 20:37होमपेज › Pune › मातंग समाजाचा ‘मूक हुंकार’

मातंग समाजाचा ‘मूक हुंकार’

Published On: Jul 22 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी मातंग समाजावर झालेल्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांचा विरोध आणि विविध मागण्यांसाठी मातंग संघर्ष महामोर्चाच्या वतीने शनिवारी ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. सारसबागेसमोरील शाहीर अण्णा भाऊ साठे  यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच संविधान वाचन आणि लहुजी वंदना म्हणून या मोर्चास सुरुवात झाली. या वेळी या मोर्चात समाजबांधव आणि महिलांचा लक्षणीय सहभाग दिसत होता.

मातंग समाजासह विविध सामाजिक संघटना, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी  कार्यकर्ते या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हा मोर्चा  बाजीराव रस्तामार्गे पुढे लक्ष्मी रस्त्याने गणपती चौक, बेलबाग चौक, सोन्या मारुती चौक, आर्यभूषण थिएटर, संत कबीर चौक ,नेहरू रोड, नरपतगिरी मार्गे  पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा गेला.  या ठिकाणी  युवतींनी मनोगते व्यक्त केली. 

या‘मूकमोर्चा’मध्ये महिला आणि युवतींचा मोठा सहभाग होता. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने मोर्चा निघाला.  मोर्चाच्या पुढच्या भागात महिला, युवती आणि त्यानंतर पुरूष होते. तसेच चार रांगांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्याालयापर्यत मोर्चा पोहचला. बहुतांशी महिला आणि  युवतींनी पिवळ्या रंगाच्या साड्या आणि टी-शर्ट परिधान केले होते. तसेच  हातात पिवळ्या रंगाचे झेंडे घेतलेले होते.

स्वयंसेवकांची शिस्त

मूक मोर्चामध्ये स्वयंसेवकांची शिस्त दिसून आली. बाहेरगावाहून आलेल्या कार्यकर्त्यांना माहिती देणे, चहा ,नास्ता, तसेच पाणी देण्याची व्यवस्था स्वयंसेवक करीत होते.

काय आहेत मागण्या

मातंग समाजावर अन्याय, अत्याचार थांबविण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी. दोषींवर कठोर कारवाई करा,  अनुसूचित जातीच्या एकत्रित आरक्षणाची अ, ब, क, ड प्रमाणे वर्गवारी करावी. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी करावी. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. मागासवर्गीय महामंडळाकडील सर्व थकीत कर्ज माफ करावीत. कोरेगाव-भीमा दंगलीतील दोषींवर कडक कारवाई करावी.