Thu, Apr 25, 2019 15:39होमपेज › Pune › माथाडी कामगार असुविधांच्या ओझ्याखाली

माथाडी कामगार असुविधांच्या ओझ्याखाली

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:29PM

बुकमार्क करा
नेहरूनगर : वार्ताहर

माथाडी मंडळाच्या दुर्लक्षामुळे माथाडी कामगार असुविधांच्या ओझ्याखाली सापडला आहे. राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या बाजूने केलेल्या कायद्याला माथाडी मंडळाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. माथाडी कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. याविरोधात माथाडी कामगारांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी बुधवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत दिला. माथाडी मंडळाने सुधारीत अध्यादेशाची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. 

राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील यांना माथाडी कामगारांच्या प्रश्नावर निवेदनाव्दारे महाराष्ट्र मजदूर संघटनेने साकडे घातले  असल्याचे सय्यद यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, कार्याध्यक्ष परेश मोरे, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, ज्ञानोबा मुजुमले, नितीन धोत्रे, शाम सोळके, प्रभाकर गुरव, सतिश कंटाळे आदी उपस्थित होते.

यावेळी सय्यद म्हणाले, ”राज्याच्या औद्यौगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांत कार्यरत असणार्‍या श्रमजिवी कामगारांच्या नोकरीचे नियमन करणे, त्यांच्या कामाच्या बाबतीत अटी, शर्ती तसेच श्रमाच्या मोबदल्यात देण्यात येणा-या वेतनाबाबत अधिक चांगल्या तरतुदी करण्यासाठी माथाडी कामगार कायद्यात योग्य त्या सुधारणा केल्या आहेत. त्यासंबंधीचा सुधारित अध्यादेश देखील काढला आहे.

या सुधारित कायद्यात माथाडी मंडळाच्या योजनांच्या माध्यमातून असुरक्षित कष्टकरी माथाडी कामगारांच्या तसेच त्यांच्या मालकांच्या नोंदण्या करण्याबरोबर या असुरक्षित घटकांसाठी स्वतंत्र भविष्यनिर्वाह निधी, उपदान, बोनस, भरपगारी रजा, आरोग्य सुविधा, कामाच्या निश्चित वेळा, कामगारांना नोकरीविषयक संरक्षण आदी सुविधा दिल्या आहेत. तसेच मुंबई, ठाणे परिसरातील कामगारांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करुन आरोग्यसुविधा दिल्या जातात. परंतु, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक परिसरातील माथाडी कामगारांसाठी अशा सुविधा दिल्या जात नाहीत. जीवन विमा निगम या संस्थेच्याही सुविधा मिळत नाहीत’, याकडेही सय्यद यांनी यावेळी लक्ष वेधले.  

अपुर्‍या मनुष्यबळाचा कामगारांना फटका

माथाडी मंडळात करोडो रुपयांचा भरणा होत असताना देखील मंडळातील अपु-या मनुष्यबळाअभावी हजारो कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत, याकडेही सय्यद यांनी लक्ष वेधले आहे. हे प्रश्न लवकरात-लवकर  मार्गी लावावेत अन्यथा महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने हजारो कामगारांसह कामगार अधिकारी बसतात त्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा सय्यद यांनी दिला.