Fri, Apr 19, 2019 08:01होमपेज › Pune › ‘बीटकॉईन’चे ‘मास्टरमाईंड’ पुणे पोलिसांनी केले जेरबंद

‘बीटकॉईन’चे ‘मास्टरमाईंड’ पुणे पोलिसांनी केले जेरबंद

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 1:09AMपुणे : प्रतिनिधी 

‘बीटकॉईन’च्या माध्यमातून फसवणूक प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ अमित भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांना सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली विमानतळावरून अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासानंतर याप्रकरणातील फसवणुकीचा अंदाज येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अमित भारद्वाज याने सिंगापूरमध्ये एप्रिल 2014 मध्ये ‘गेन बीटकॉईन’ (जीबी 21) नावाची कंपनी सुरू केली. अमित भारद्वाज याचे वडील महेंद्रकुमार भारद्वाज याला कंपनीचा प्रमुख करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीची ‘गेन बीटकॉईन’ नावाची वेबसाईट सुरू करून, आम्ही ‘क्‍लाऊड मायनिंग’ करणार असल्याचे सांगून, त्यासाठी कमीत कमी गुंतवणूक 0.1 बीटकॉईन इतकी ठेवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ‘एमकॅप फेज वन’ नावाची कंनपी स्थापन केली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास चार महिन्यांत 200 टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले होते.

मात्र यात गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना काहीही मिळाले नाही. त्यानंतर सात महिन्यांनी त्यांनी पुन्हा दुसरी ‘एमकॅप फेज 2’ अशी कंपनी सुरू करून, त्यातही गुंतवणूक केल्यास 400 टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले.

गुंतवणूकदारांकडून बीटकॉईनच्या स्वरूपात गुंतवणूक घेऊन, त्यावर दरमहा 0.1 टक्के बीटकॉईनवर 1. 8 बीटकॉईन 18 महिन्यांत मिळतील, असे अमिष दाखविण्यात आले. याद्वारे फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर 13 जानेवारी 2018 रोजी रायसोनी या महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी व निगडी आणि राज्यातील नांदेड येथेही गुन्हा दाखल आहे. या भारद्वाज कंपनीने देशातील तब्बल आठ हजार जणांना गंडा घातला असल्याचे उघडकीस आले असल्याचेही पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी या वेळी सांगितले. 

नोटबंदीनंतर सर्वाधिक गुंतवणूक

केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर देशातील सर्वाधिक गुंतवणूक या कंपन्यांमध्ये करण्यात आली. कंपनीकडून रोख रक्कम स्वीकारली जात असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काळा पैसा लपविण्यासाठी सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली. या फसवणूक प्रकरणात उच्चभ्रू लोकांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. 

अंदाजे चारशे कोटींची फसणूक 

पुणे पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीमधील एक सायबर स्पेशालिस्ट म्हणून पंकज घोडे यांनी ‘पुढारी’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आठ हजार जणांनी यात गुंतवणूक केली आहे. प्रत्येकी 1 बीटकॉईन जरी गुंतवणूक समजल्यास, एका बीटकॉईनची किंमत पाच लाख रुपये आहे. त्यानुसार अंदाजे 400 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे.

रश्मी शुक्‍लांचे मौन

या प्रकरणात तपासाबाबत खूप गोपनीयता पाळण्यात आली आहे. तसेच पुणे पोलिसांचे पथक दिल्लीत तळ ठोकून होते. भारद्वाज बंधूंना दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली, असे रश्मी शुक्‍ला यांनी सांगितले. मात्र ते कोणत्या देशातून प्रवास करून आले. त्यांना अटक करण्यासाठी भारत सरकारच्या कोणत्या यंत्रणांनी मदत केली, याबाबत त्यांनी मौन बाळगले.  

कंपनीतील बडे मासे सेव्हन स्टार्स 

अमित भारद्वाज व विवेक भारद्वाज हे दोघे ‘गेन बीटकॉईन’, ‘जीबी मायनर्स’, व ‘जीबी 21’ या कंपन्यांचे सीईओ आणि फाऊंडर आहेत. ते या फसवणुकीचे मुख्य सूत्रधार आहेत. कंपनीत दोघांचे वडील महेंद्रकुमार भारद्वाज यांना त्यांनी प्रमुख केले. त्यानंतर कंपनीतील महेंद्रकुमार भारद्वाज, अमित भारद्वाज, विवेक भारद्वाज, आशिष दाबास, मनू शर्मा, रूपेश सिंग यांना कंपनीचे सेव्हन स्टार्स म्हणून लोकांसमोर सादर करण्यात आले. त्यासोबतच अदलाखा या मोटीव्हेशनल स्पीकरचा वापर लोकांना जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यासाठी करण्यात आला. 

 

Tags : pune, pune news, crime, Bitcoin, Mastermind arrested,