Sun, May 26, 2019 12:38होमपेज › Pune › गुन्हेगारांनी आखलेल्या ‘मास्टर प्लॅनच्या’ चिंध्या

गुन्हेगारांनी आखलेल्या ‘मास्टर प्लॅनच्या’ चिंध्या

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 16 2018 12:34AMवाकड : संतोष शिंदे 

पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी अलीकडच्या काळात आरोपींकडून शांत डोक्याने ‘मास्टर प्लॅन’ आखण्यात आले. मात्र हिंजवडी पोलिसांसमोर हे ‘प्लॅन’ तग धरू शकले नाहीत. काही प्रकरणात तर अवघ्या काही तासातच या ‘मास्टर प्लॅन’च्या पोलिसांनी चिंध्या केल्याचे पहावयास मिळाले. कार्यक्षम अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे हिंजवडीतील काही ‘किचकट’ प्रकरणात फिर्यादीच आरोपी असल्याचे उघड झाले आहे. 

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नी व बाळाचा खून केल्याची घटना नुकतीच घडली. या दुहेरी खुनानंतर आरोपीने अज्ञातांनी हल्ला करून लूटमार केल्याचा बनाव केला. पुढील चौकशीत ठरवलेली उत्तरे पोलिसांना देण्यात आली. या गुन्ह्यात आरोपीने मदतीसाठी दोन लाखांची सुपारी देखील दिली होती. अतिशय शांत डोक्याने हा ‘प्लॅन’ तयार करण्यात आला होता. आरोपीचे कृत्रिम वागणे पोलिसांच्या नजरेला सुरुवातीपासूनच खटकत होते. उलट चौकशी सुरू केल्यानंतर काही तासातच हा ‘मास्टर प्लॅन’ उघडा पडला. 

या गुन्ह्याशी साधर्म्य असलेला अशाच एका गुन्ह्यामध्ये कासारसाई साखर कारखान्याच्या रस्त्यावर घडला होता. विवाहबाह्य संबंधात अडथळा होत असल्याकारणाने संतोष वसंत कोयते याने आपल्या पत्नीला मारण्याची सुपारी दिली होती. संतोष त्याची पत्नी भाग्यश्री, मुलगा साईराज आणि आईला घेऊन देवदर्शनाला जात असताना हल्लेखोरांनी दुचाकी आडवी लावून गळ्यातील सोन्याची मागणी केली.

पत्नी भाग्यश्रीने सोने देण्यास नकार दिल्याने तिच्यावर कोयत्याने वार केले, अशी फिर्याद दिली होती. या प्रकरणात देखील तपास करणे किचकट होते. कोयते कुटुंबीय स्थानिक असल्याने पोलिसांसमोर मोठा पेच होता. उलट तपासणी करीत असताना पोलिसांवरच आरोप केले जाण्याची शक्यता जास्त होती. तरी देखील हिंजवडी पोलिसांनी संतोष कोयतेला ताब्यात घेत खाक्या दाखवला. पोलिसी खाक्यासमोर संतोषनेच दोन मित्रांच्या मदतीने पत्नीच्या हत्येचा कट आखल्याची कबुली दिली. भाग्यश्रीला वेळेत उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. 

कर्जबाजारी झाल्याने कुरिअरबॉय बेहरामने तब्बल दीड कोटी रुपयांचे सोने चोरट्यांनी पळवून नेल्याचा बनाव केला अन् शहरात एकच खळबळ उडाली. बेहराम बालेवाडी येथील एका ज्वेलर्समध्ये ‘कुरिअरबॉय’चे काम करत होता. मुंबईतून सोने घेऊन येत असताना चोरट्यांनी त्याला लुटल्याची फिर्याद हिंजवडी पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून तपास करत असताना यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय पोलिसांना आला. या प्रकरणात गुन्हे शाखा आणि हिंजवडी पोलिस समांतर तपास करीत होते. बेहराम खोटे बोलत असल्याच्या मुद्द्यावर गुन्हे शाखा आणि हिंजवडी पोलिसांचे एकमत झाले. बेहरामच्या उलट तपासणीमध्ये बेहरामनेच बनाव केल्याचे कबूल केले. 

पाषाण येथील महादेव शर्मा यानेदेखील गाडीचे हप्ते बुडवण्यासाठी आपली महागडी कार चोरीला गेल्याचा कांगावा केला होता. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खोटी फिर्याददेखील दिली होती. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असताना तपास पथकाच्या एका कर्मचार्‍याने त्याला हटकले. त्याच्या उत्तरांवरून त्या कर्मचार्‍याला संशय आला. शर्माला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता तो नंबरप्लेट बदलून कार वापरत असल्याचे निष्पन्न झाले.