Wed, Apr 24, 2019 01:40होमपेज › Pune › आरक्षण आंदोलनासाठी ‘मास्टर प्लॅन’

आरक्षण आंदोलनासाठी ‘मास्टर प्लॅन’

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:54AMपुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारने धनगर समाजाला आरक्षणाच्या नावाखाली चार वर्षे झुलवत ठेवले. दरम्यान, धनगर आरक्षणासाठी समाजाने मास्टर प्लॅन तयार केला असून कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचेच, असा निर्धार पुण्यात रविवारी धनगर आरक्षण कृती समितीच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला. 

धनगर आरक्षण कृती समितीची राज्यव्यापी बैठक पुण्यात रविवारी पार पडली. या वेळी जलसंधारणमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार दत्तात्रय भरणे, रामराव वडकुते, रामहरी रुपनवर, माजी आमदार हरिभाऊ बधे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह कृती समितीचे मदनराव देवकाते, परमेश्वर कोळेकर, विठ्ठल पाटील, शिवाजीराव बंडगर, यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़

धनगर आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वप्रथम पुण्यातील विधानभवनावर लाक्षणिक उपोषण, प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि चौंडी येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 10 ऑगस्ट रोजी पुण्यातील विधानभवनासमोर धनगर समाजाचे सर्व आजी- माजी आमदार व समाजातील सर्व पदाधिकारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत़  14 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे़  तर 24 ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे़.  

त्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यात येणार आहे़  त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत 8 सप्टेंबर रोजी दुपारी एका वाजता चौंडी येथे समाजाचा महामेळावा आदी ठराव करण्यात आले आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर धनगर आरक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे या बैठकीत राम शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक परमेश्वर कोळेकर यांनी केले, तर आभार दादासाहेब काळे यांनी मानले़

धनगर समाजाला गेल्या पन्नास वर्षांपासून धनगर समाजाच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवले आहे़  त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्यात येणार असून आरक्षण मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही़     - विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे