Thu, Apr 25, 2019 03:31होमपेज › Pune › विवाहबद्ध झाले भारतात; मात्र काडीमोड विदेशातून

विवाहबद्ध झाले भारतात; मात्र काडीमोड विदेशातून

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 17 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी 

भारतात विवाह झाल्यानंतर परदेशात असलेल्या दोघांच्या संसाराचा काडीमोड विदेशातून कोर्ट कमिशनरच्या माध्यमातून कौटुंबिक न्यायालयाने केला आहे. पतीने अमेरिकेतून, तर पत्नीने जर्मनीतून घटस्फोटाच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत न्यायालयात हजेरी लावली. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा आदेश दिला. अ‍ॅड. झाकिर मणियार यांची या प्रकरणात कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्‍ती करण्यात आली होती. या दाव्यात अ‍ॅड. प्रगती पाटील यांनी मिडीएटर म्हणून काम पाहिले, तर अर्जदारांतर्फे अ‍ॅड. गणेश कवडे यांनी कामकाज पाहिले. 

या दोघांचा जुलै 2016 मध्ये पुण्यात विवाह झाला होता; मात्र, विवाहानंतर दोघांचे एकमेकांशी अजिबात पटले नाही. त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पती नोकरीनिमित्‍त अमेरिकेत तर पत्नी जर्मनी येथे आहे. परदेशात नोकरीनिमित्त गेलेल्या या दोघांनी पुणे कौटुंबिक न्यायालयात पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी नातेवाईकांना देऊन घटस्फोटाचा दावा दाखल केला. त्या दोघांना भारतात येऊन सुनावणीला न्यायालयात हजर राहणे शक्य नव्हते. मात्र, फॅमिली कोर्टातील व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे परदेशातील पक्षकारांबरोबरही संवाद साधण्याच्या तंत्रज्ञानामुळे त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यांची साक्ष नोंदविण्यासाठी फॅमिली कोर्टाकडून अ‍ॅड. झाकीर मणियार यांची याप्रकरणात कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या दोघांची अमेरिकेत आणि जर्मनीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे साक्ष नोंदवून त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. न्यायालयाने त्यांचा परस्पर संमतीचा घटस्फोटाचा दावा मंजूर केला.

पतीने पत्नीला तीन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही मान्य केले. पूर्वी कौटुंबिक वादानंतर व्यक्तींना स्वत: कोर्टात हजर राहावे लागत असे. परदेशात राहणार्‍या व्यक्तींना तेथील राजदूतासमोर प्रतिज्ञापत्रे सादर करून भारतीय कोर्टात सादर करावी लागत असे. त्यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. मात्र कोर्टातूनच थेट संबंधितांशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्याची ओळख आणि कागदपत्रांची शहानिशा करून थेट संवाद साधला जातो.  व्हिडिओ कॉन्फरसिंगची सुविधा परदेशातील पक्षकारांसाठी फायदेशीर ठरणारी आहे, असे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले.