Mon, Aug 19, 2019 09:10होमपेज › Pune › मार्केट यार्डला असुविधांचे ग्रहण

मार्केट यार्डला असुविधांचे ग्रहण

Published On: May 18 2018 1:32AM | Last Updated: May 18 2018 12:38AMपुणे : सुनील जगताप

पिण्याच्या पाण्याच्या टाकीनजीक डुकरांचा वावर, उखडलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांवर धुळीचा अभिषेक, कचर्‍याचा ढीग, सदैव वाहतूक कोंडी अन् दिवसाढवळ्या मद्यपी आणि जुगाराचे अड्डे हे चित्र कोणत्या खेड्यातील नसून तब्बल साडेतीन कोटींचा नफा मिळविणार्‍या मार्केट यार्डातील आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लौकिक असलेल्या या यार्डाला असुविधांचे ग्रहण लागले आहे. सेसच्या रूपाने मिळणारा हा नफा बाजार समिती कोठे खर्च करते, असा सवाल व्यापार्‍यांबरोबरच येथे येणारे शेतकरी आणि ग्राहकांकडून केला जात आहे.

बाजार समिती एका बाजूला कोटीच्या कोटी उड्डाणे मारत असताना दुसर्‍या बाजूला मात्र शेतकरी, व्यापारी आणि इतर घटकांना सोयी-सुविधा पुरविण्यात अपुरी पडत आहे. गूळ-भुसार विभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी व्यापार्‍यांकडून होत आहे. परंतु, बाजार समिती टेंडरच्या खेळात अडकली आहे. बाजार समितीमध्ये प्रामुख्याने गूळ-भुसार विभागात गहू, तांदूळ याचा बाजार मोठा आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत हे व्यापारही अलिकडच्या काळात डबघाईला येऊ लागले आहेत. गेट नं. 1 जवळ असलेल्या पार्किंगमध्ये अपुर्‍या जागेअभावी वाहनचालक आणि ठेकेदारांमध्ये वारंवार भांडणे होताना दिसून येत असून पार्किंग मालकाकडे असलेले कर्मचारीही ग्राहकांशी उद्धटपणे वागत आहेत. पान बाजार येथे पूर्वी भाजीविक्रेत्यांना हटवून तेथे टेम्पो चालकांना वाहनतळासाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्याठिकाणीही टेम्पो धारकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहेत.

केळी बाजार, पान बाजार आणि तरकारी विभागातील काही भागात डुकरांचा वावर वाढत चालला असून त्यामुळे शेतमालाला मोठ्या प्रमाणावर धोका पोहचत असून आरोग्याचा ही प्रश्‍न महत्त्वाचा ठरत आहे. केळी बाजारात असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळच डुकरांनी आपली वस्ती केली असून त्याच ठिकाणाहून व्यापारी आणि शेतकर्‍यांना पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. या विभागातील अनेक ठिकाणचा कचराही उचलला जात नसल्याने डुकरांनी थैमान घातले आहे. प्रायोगिक तत्वावर जनावरांच्या बाजारात सुरू केलेल्या पे अ‍ॅण्ड पार्ककडेही दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीमध्ये एक उपसचिव, तीन सहाय्यक सचिव, 248 अधिकारी-कर्मचारी आणि 171 रोजंदारीवर कर्मचारी कार्यरत आहेत. एकंदरीत बाजार समिती शेतकर्‍यांच्या येणार्‍या मालावर कोटी रुपयांचा सेस वसूल करीत असताना त्यांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधा मात्र तोकड्या असून प्राथमिक सुविधा देण्यात ही बाजार समिती अपयशी ठरत आहे. 

साडेतीन कोटींचा निव्वळ नफा...

पुणे कृषी उत्पन्‍न बाजार समितीला गेल्या वर्षी (2016-17) सेसच्या माध्यमातून मिळणारी बाजार फी ही 38 कोटी 65 लाख 67 हजार 034 रुपये मिळाली होती. तर यावर्षी (2017-18) 42 कोटी 12 लाख 15 हजार 572 रुपये फी स्वरूपात निधी मिळालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 3 कोटी 46 लाख 48 हजार 538 रुपयांची वाढ असून इतर उत्पन्‍न, गुंतवणूक उत्पन्‍न आणि मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्‍नही अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समितीला 3 कोटी 54 लाख 96 हजार 603 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे दिसून आले आहे.