होमपेज › Pune › सिडनी आकाशवाणीवर मराठी दुर्गप्रेमींची मुलाखत

सिडनी आकाशवाणीवर मराठी दुर्गप्रेमींची मुलाखत

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 1:35AMपिंपरी : प्रतिनिधी

विविध क्षेत्रात महाराष्ट्र प्रगती करत असून आता महाराष्ट्रातील सामाजिक कार्याची दखल सातासमुद्रापार घेतली जात आहे. शहरातील शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या दुर्गसंवर्धनाच्या कार्याची ऑस्ट्रेलियातील सिडनी आकाशवाणीकडून दखल घेण्यात आली. ९८.५ मेगा हर्ट्झवर सिडनी आकाशवाणी हा रेडिओ चॅनल तिथे सुरु आहे. या रेडिओ चॅनलने महाराष्ट्रात दुर्गसंवर्धन करणार्‍या शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे पदाधिकारी विनायक रेणके यांची मुलाखत घेतली. या निमित्ताने महाराष्ट्राचा गड-किल्ल्यांच्या इतिहासाला सातासमुद्रापार उजाळा देण्यात आला. 

पिंपरी-चिंचवड, मावळसह पुणे शहरातील नोकरदार तसेच व्यावसायिकांनी दहा वर्षांपूर्वी शिवदुर्ग संवर्धन संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणारे दुर्गसंवर्धनाचे कार्य, तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्व, त्यांचा दैदिप्यमान इतिहास व महाराष्ट्राचे गतवैभव आणि सद्यस्थिती या सर्वच बाबींवर मुलाखतीतून प्रकाश टाकण्यात आला. मुलाखती दरम्यान विनायक रेणके यांनी लहानपणी एकदा वडिलांबरोबर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या एका कार्यक्रमाला गेलो असतांना त्यांना दुर्गसंवर्धनाचे महत्व समजले. तेव्हापासून खर्‍या अर्थाने किल्ल्यांप्रती आकर्षण वाढले तसेच तिथल्या समस्यांचा अभ्यास सुरु झाला असल्याचे आवर्जून सांगितले. मागील दहा वर्षांपासून पिंपरी चिंचवडमधील दुर्गमित्र तसेच मावळ्यांसह  शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या माध्यमातून ते दुर्गसंवर्धनाचे काम करत आहेत. सदस्य कामाचा व्याप सांभाळून शनिवार व रविवारी जवळच्या किल्ल्यांना भेट देउन किल्ल्यांच्या समस्या जाणून त्यावर काम करत आहेत. आता किल्ल्यांचे स्वरुप बदलले असून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे रेणके यांनी सांगितले.