Mon, Nov 19, 2018 11:22



होमपेज › Pune › मराठा क्रांती मोर्चाचे चक्री उपोषण सुरू

मराठा क्रांती मोर्चाचे चक्री उपोषण सुरू

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:09AM



पुणे : प्रतिनिधी

मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, तसेच आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात झाली आहे. 

या उपोषणात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर, रघुनाथ चित्रे, बाळासाहेब आमराळे, हनमंत मोटे, किशोर मोरे, नाना निवंगुणे, मुकेश यादव, संजय शिरोळे, सुशील पवार, अरुण वाघमारे, शिवाजीराव बिराजदार, माधव बारणे यांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.  आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी खास आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. या आचारसंहितेनुसारच आंदोलकांनी बेमुदत चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन करावे, असे आवाहन राज्य समन्वयकांनी केले आले. 

शांताराम कुंजीर म्हणाले की, मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे  दोन वर्षांपासून शांततेच्या मार्गाने व अहिंसक पध्दतीने आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या घटना व घडामोडींवरून समोर आले आहे. या आंदोलनात बाह्य शक्तींचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याचा सूत्रधार कोण आहे याचा पोलिसांनी व राज्य शासनाने शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी. गेल्या काही दिवसांत मुंबईसह औरंगाबाद, चाकण, कळंबोली, नवी मुंबई आदी परिसरात जाणीवपूर्वक दंगली घडविण्यात आल्या. त्यात कोण सहभागी होते याचाही शोध घेण्याची गरज आहे. या प्र्रकरणात राज्य शासनाची गुप्तचर संस्था अयशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

आंदोलकांसाठी आचारसंहिता

चक्री उपोषण आंदोलनात सहभागी होणार्‍यांसाठी आचार संहिता तयार करण्यात आली आहे. आंदोलन शांततेने, संयमाने व शिस्तीने करावे, गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये, प्रक्षोभक व भडकावू घोषणा-भाषणे करू नये, आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकाव्या, अनुचित प्रकार करणार्‍यांना रोखून पोलिसांच्या ताब्यात द्या, अशी वर्तणूक ठेवून कार्यकर्त्यांनी बेमुदत चक्री उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या समन्वयकांनी केले असून तसा फलकही त्याठिकाणी लावण्यात आला आहे.