Fri, Jul 19, 2019 18:44होमपेज › Pune › ९ ऑगस्टपासून महाराष्ट्र बंद!

९ ऑगस्टपासून महाराष्ट्र बंद!

Published On: Aug 03 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर व जिल्हातर्फे गुरुवारी  लोकप्रतिनिधींच्या कार्यालय-निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन न दिल्यास दि. 9 ऑगस्टपासून महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.

मराठा क्रांती मोर्चाने ‘आमदार, खासदारांनो जागे व्हा, खोटे गुन्हे मागे घ्या’, ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण, पालकमंत्री गिरीश बापट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कार्यालय-निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने 1 ऑगस्टपासून आमदार, खासदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याअंतर्गत गुरुवारी सकाळी नऊ वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसब्यातील कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून घंटानाद करीत जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला घटनात्मकद‍ृष्ट्या वैध आरक्षण त्वरित द्यावे, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवनासाठी सरकारी जमीन देण्यात यावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी योग्य दुरुस्ती करावी, सरसकट कर्जमुक्ती व शेतमालाला हमीभावासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, पदोन्नतीत खुल्या प्रवर्गातील कर्मचार्‍यांवर होणारा अन्याय थांबवावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन या वेळी पालकमंत्र्यांना देण्यात आले.

त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या लोकमान्यनगर येथील निवासस्थानाबाहेर आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या कॅन्टोन्मेंटमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर आंदोलने केली. या प्रसंगी मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, रघुनाथ चित्रे पाटील, धनंजय जाधव, अभयसिंह आडसुळ, तुषार काकडे  यांसह महिला आणि पुरुष आंदोलक सहभागी झाले होते.

आज खासदारांच्या घरासमोर

शुक्रवारी सकाळी 10 वाजता आ. मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर तर सकाळी 12 वाजता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले

अहवाल मिळताच विशेष अधिवेशन : गिरीश बापट

मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भातील ठराव केंद्राकडे पाठविला जाईल. त्यासाठी घटनादुरुस्ती करून, इतर राज्यांचीही मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यानुसार सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात आहे. आंदोलनादरम्यान खोटे, किरकोळ स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चानेही शांततामय मार्गाने आंदोलन करून, सरकारी मालमत्तेचे नुकसान; तसेच जीवितहानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी केले.