होमपेज › Pune › ‘मराठा संवाद यात्रे’ला प्रारंभ

‘मराठा संवाद यात्रे’ला प्रारंभ

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 06 2018 1:54AMबारामती : प्रतिनिधी

सामाजिक एकोपा टिकविण्यासाठी बारामती ते मुंबई या पाच दिवसांच्या मराठा संवाद यात्रेला रविवारी (दि. 5) येथील कसब्यातील शिवाजी उद्यानातून प्रारंभ झाला. याप्रसंगी सकल मराठा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते.

येथील प्रशांत सातव मित्र परिवाराकडून सध्याच्या अस्थिर परिस्थितीत समाजप्रबोधन व जनजागृती करण्यासाठी मराठा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. मराठा मोर्चामध्ये काही समाजकंटक घुसून समाजव्यवस्था बिघडवली जात आहे. दुसरीकडे आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाजातील युवक-युवती मोठ्या प्रमाणात   आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत, या पार्श्वभूमीवर ‘सेव्ह मराठा सेफ मराठा’ हे ब्रीद घेऊन मराठा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. 

कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानातून विविध मान्यवरांच्या हस्ते या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यात्रेचा रविवारी रात्रीचा मुक्काम निरा येथे असणार आहे. सासवड, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई येथील मुक्काम उरकून ही यात्रा 9 ऑगस्ट क्रांतीदिनी मुंबई येथील आझाद मैदानात पोहचणार आहे.प्रशांत सातव यांच्या संकल्पनेतून या संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून समाजातील सर्व घटकांशी सुसंवाद साधता यावा यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे.

यात्रेप्रसंगी सर्वांनी आरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. दोन वाहनांद्वारे माहितीपत्रकांचे वाटप, शहीद झालेल्यांना श्रद्धांजली, जागृती व प्रबोधन असे उपक्रम या संवाद यात्रेतून केले जाणार आहेत. दरम्यान बारामतीतून निघालेल्या या यात्रेचे माळेगाव बुद्रुक, पणदरे, कोर्‍हाळे बुद्रुक, वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर आदी ठिकाणी मराठा बांधवांकडून स्वागत करण्यात आले.