Thu, Aug 22, 2019 09:09होमपेज › Pune › मराठा आरक्षण : पुण्यातील चक्री उपोषण तूर्त स्थगित

मराठा आरक्षण : पुण्यातील चक्री उपोषण तूर्त स्थगित

Published On: Aug 28 2018 1:36AM | Last Updated: Aug 28 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य 21 मागण्यांसाठी सुरू असलेले चक्री उपोषण महिनाभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. या काळात प्रशासनाकडून अपेक्षित अशी प्रगती न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे जाहीर करण्यात आली.

मराठा समाजाच्या असलेल्या मागण्यांसंदर्भात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयांतर्गत असलेल्या पाच जिल्ह्यांमधील प्रश्‍नांसाठी विभागीय आयुक्त आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, विजयसिंह देशमुख यांच्यासह सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथील सर्व जिल्हाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, बाळासाहेब आमराळे, विकास पासलकर, रघुनाथ चित्रे-पाटील, किशोर मोरे, हनुमंत मोटे, सारथीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, रेखा कोंडे, डॉ. सुनीता मोरे, नाना निवंगुणे, डॉ. मानसी जाधव यांच्यासह अधिकारी आणि मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), राजर्षी छत्रपती शाहू महाराज योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह आदींसंदर्भात काम पाहणार्‍या जिल्हाधिकारी आणि अधिकार्‍यांकडून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना एक महिन्याचा अंतिम कालावधी देऊन कार्यवाहीला गती देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी या बैठकीत दिले. या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना चक्री उपोषण मागे घेण्याचे आवाहन करीत पुढील महिन्यामध्ये पुन्हा संबंधित अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. या आवाहनाला प्रतिसाद देत मोर्चा आयोजकांनी चक्री उपोषण एक महिन्यासाठी स्थगित केले आहे.

या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील तरुणांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, राज्यात आत्मबलिदान केलेल्या 34 मराठा युवकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपये मदत आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास 10 हजार कोटींचा निधी देऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, सारथी संस्थेसाठी किमान पाच हजार कोटींचा निधी वर्ग करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करणे, राजर्षी छ. शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजनेंतर्गत प्रवेश नाकारणार्‍या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई करणे आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

आयुक्तांसमवेत सकारात्मक चर्चा ः शांताराम कुंजीर

सारथी योजनेसाठी सरकारने केवळ पाच कोटी रुपये दिले असून, या ठिकाणी कर्मचार्‍यांचीही कमतरता आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 85 कोटी रुपयांचा प्रस्ताव गेलेला आहे. परंतु, हा निधी वाढविणे गरजेचे आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या 500 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत सकारात्मकता असून, जुन्या वसतिगृहांची दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. औंध येथील वसतिगृहाचे काम सुरू असून, दि. 15 सप्टेंबर रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे. तसेच इतर मागण्यांसंदर्भातही विभागीय आयुक्तांनी सकारात्मकता दाखविली आहे, असे शांताराम कुंजीर यांनी सांगितले.

अन्यथा कार्यालयात होणार आंदोलन ः राजेंद्र कोंढरे

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने हे चक्री उपोषण एक महिन्यासाठी स्थगित करण्यात येत आहे. महिन्यानंतर पुन्हा मागण्या किती पूर्ण झाल्या, याबाबत आढावा घेऊन बैठक घेण्यात येईल. समाधानकारक प्रगती आढळून न आल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन न करता कार्यालयामध्येच आंदोलन केले जाईल आणि आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येईल, असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.