Sun, Nov 18, 2018 18:23



होमपेज › Pune › व्यापारी-आंदोलकांमध्ये उरुळी कांचनला हाणामारी

व्यापारी-आंदोलकांमध्ये उरुळी कांचनला हाणामारी

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:40AM



उरुळी कांचन : वार्ताहर

मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि. 30) केलेल्या हवेली बंदच्या आवाहनास उरुळी कांचन (ता. हवेली) येथे व्यापारी आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादावादीने गालबोट लागले. मराठा संघटनांनी महात्मा गांधी रस्त्यावरील व्यापार्‍यांना केलेल्या बंदच्या आवाहनात आंदोलक व व्यापार्‍यांत मारहाण घडल्याचा प्रकार सकाळी 10:30 सुमारास घडला आहे. पोलिसांनी तातडीने प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न केला असून, पोलिसांची अतिरिक्‍त कुमक उरुळी कांचन शहरात तैणात करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंद करण्याच्या आवाहनास उरुळी कांचन शहरात सकाळपासून संदिग्ध भूमिका होती. शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापार्‍यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली होती. परंतु, महात्मा गांधी रस्त्यावरील काही व्यापार्‍यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले होते. सकल मराठा संघटनेच्या सुमारे 50पेक्षा अधिक आंदोलकर्त्यांनी महात्मा गांधी रस्ता मार्गे व्यापार्‍यांनी केलेल्या बंदच्या आवाहनास काही व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला. या दरम्यान व्यापारी व काही आंदोलकर्त्यांंत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.  पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली.   

जळोची बाजारात सर्व व्यवहार बंद 

बारामती : बारामतीतील फळे व भाजीपाला आडतदार संघटनेतर्फे सोमवारी (दि. 30) समितीच्या जळोची उपबाजार आवारातील सर्व व्यवहार बंद ठेवून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यासंबंधी संघटनेकडून बाजार समितीच्या सभापतींना निवेदन देण्यात आले होते.

पोलिस कारवाई होणार

उरुळी कांचन बंदच्या दिवशी व्यापारी व आंदोलनकर्त्यांत झालेल्या हाणामारीची कायदेशीर तक्रार घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी स्पष्ट केले आहे.