Sun, Jul 21, 2019 08:05होमपेज › Pune › मराठा आरक्षण : पिंपरी-चिंचवड परिसरात कडकडीत बंद

मराठा आरक्षण : पिंपरी-चिंचवड परिसरात कडकडीत बंद

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 10:35PMपिंपरी : प्रतिनिधी 

सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग थांबता थांबेना झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी व दुकानदारही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जुनी सांगवीमधील व्यापारी व दुकानदारांनी कडकडीत बंद ठेवून सहभाग दर्शविला.

राज्यासह पिंपरी-चिंचवड मध्येही सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी दुकाने बंद ठेवण्यासाठ आवाहन करण्यात येत आहे. मराठा समाजाच्या बंदला साथ देत शहरातील दुकानदार व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवित आहेत. मंगळवारी (दि. 24) शहरातील पिंपरी कॅम्प मार्केट, काळेवाडी, थेरगांव, चिखली, भोसरी, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, वाकड, थेरगाव आदी ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. बुधवारीही व्यापार्‍यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. जुनी सांगवी येथील दुकाने व्यापार्‍यांनी बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. बाजारपेठ सुरू असल्यामुळे या परिसरात नागरिकांची गर्दी असते; मात्र दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांची गर्दीही कमी झाली होती. दुपारी जुनी सांगवी येथील रस्त्यावर शुकशुकाट होता.

शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गांने आंदोलन सुरू ठेवले आहे. आरक्षणासाठी वारंवार शासनाकडे निवेदने दिली जात आहेत. नुकतीच मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावेळी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला होता. शहरात ठिकठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आले. व्यापारी व दुकानदारांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जुनी सांगवी येथे या आंदोलनाला मोठा पाठिंबा देत व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता.