Tue, May 21, 2019 00:36होमपेज › Pune › राजगुरुनगरमध्ये ८ तास ‘रास्ता रोको’

राजगुरुनगरमध्ये ८ तास ‘रास्ता रोको’

Published On: Jul 31 2018 1:43AM | Last Updated: Jul 31 2018 1:35AMराजगुरुनगर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजगुरुनगरमध्ये पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला दुसर्‍या टप्प्यात हिंसक वळण लागले. ‘रास्ता रोको’ सुरू असताना एक खासगी बस चालकाने बस पुढे आणण्याचा प्रयत्न केल्यावर जमावाकडून बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात एका महिलेसह दोन जण जखमी झाले. पुणे-नाशिक महामार्गावर सकाळी अकरा वाजता सुरू झालेला ‘रास्ता रोको’ सलग आठ तास सुरू राहिला. या दरम्यान प्रवासी, वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. 

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अकरा वाजता मोर्चा निघाला. आमदार सुरेश गोरे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आदी मोर्चात सहभागी झाले होते. बाजारपेठ, नेहरू चौकातून वाडा रस्त्याने हा मोर्चा पुणे-नाशिक महामार्गावर हुतात्मा राजगुरू पुतळ्याजवळ आला. त्यावेळी येथे ‘रास्ता रोको’ सुरू करण्यात आले. 

अतिशय शांततेने आणि नियोजनबद्ध एक तासाचे हे आंदोलन झाल्यावर समन्वयक आणि नेते मंडळी येथून निघून गेली. मात्र, त्यानंतर चार-पाचशे युवकांनी ‘हा ठोक मोर्चा असून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत ‘रास्ता रोको’ सुरू ठेवणार’, असा पवित्रा घेत हे आंदोलन पुढे सलग सहा तास सुरू ठेवले. सुरुवातीला शांततेचा वाटणार्‍या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले.

कात्रजहून भीमाशंकरला निघालेली लक्झरी बस (एमएच 04, एफके 1494) चालकाने आंदोलन सुरू असलेल्या पाबळ चौकात बस आणल्यावर जमावाने दगडफेक केली. बसच्या पुढील व प्रवासी खिडक्यांच्या अनेक काचा फोडण्यात आल्या. या बसमध्ये पन्नास महिला, लहान मुले, पुरुष असे प्रवासी होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. जमावाने केलेल्या दगडफेकीत रत्नप्रभा चव्हाण, अमित उणेचा हे दोघे गंभीर जखमी झाले. चालक किरकोळ जखमी झाला.