Thu, Apr 25, 2019 21:27होमपेज › Pune › निर्ढावलेल्या अधिकार्‍यांना मराठा महासंघ वठणीवर आणणार

निर्ढावलेल्या अधिकार्‍यांना मराठा महासंघ वठणीवर आणणार

Published On: Jun 27 2018 1:57AM | Last Updated: Jun 27 2018 1:13AMपिंपरी : प्रतिनिधी

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पहिल्यापासून प्रयत्न करत आहे. महासंघानेच सर्वप्रथम याबाबत जनजागृती केली. आरक्षण हा आमचा हक्‍क असून मराठा समाजातील सर्व युवक-युवतींना शिक्षण, उद्योग, व्यवसाय व व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्यामध्ये अडथळा आणणार्‍या अधिकार्‍यांना वठणीवर आणणार असल्याचा इशारा अखिल भारतीय युवक मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस दशरथ पिसाळ यांनी दिला. 

पिंपरी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या वेळी पिसाळ बोलत होते. प्रदेश संघटक संतोष शंकर लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष उदय पाटील, शिवानंद लांडगे, संतोष लांडगे, धनंजय जगदाळे, विजय बोर्‍हाडे आदी या वेळी उपस्थित होते. पिसाळ म्हणाले की, मागील वर्षी राज्य सरकारने काढलेला श्री राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा केवळ आदेश न काढता अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. प्रत्यक्षात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेशावेळी संबंधीत संस्थांकडून संपुर्ण फी भरण्याची मागणी केली जाते. पालकांनी चालू शैक्षणिक वर्षी प्रवेश घेताना संपूर्ण फी मागणार्‍या शिक्षण संस्थांविरुध्द तक्रार द्यावी. अशा संस्थांना अखिल भारतीय युवक मराठा महासंघ धडा शिकवेल. 

कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने आदेश काढले; मात्र प्रत्यक्षात युवकांना हे कर्ज देण्यासाठी बँकाकडून अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मागणी व अडवणूक केली जाते. गरजु युवकांनी ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण करून अर्ज भरल्यानंतर बँक अधिकारी मुलाखतीच्या वेळी आम्हाला शासनाचा आदेश प्राप्त झालेला नाही, त्यामुळे या योजनेखाली कर्ज देण्याचे नाकारतात. शेतकर्‍यांना कर्ज मिळवण्यासाठी व कर्जमाफीसाठी बँक अधिकारी अडवणूक करतात. माता-भगिनींना छळतात अशा निर्ढावलेल्या अधिकार्‍यांना व त्यांच्या दलालांना वठणीवर आणू असा इशारा देण्यात आला.