Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Pune › अतिवरिष्ठांच्या ‘लाडक्या’ एक्सपर्टचे अनेक कारनामे

अतिवरिष्ठांच्या ‘लाडक्या’ एक्सपर्टचे अनेक कारनामे

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

राज्य शासनाने दिलेले निर्देश धाब्यावर बसवून शहर पोलिसांनी खासगी ‘सायबर एक्सपर्ट’ला प्रचंड अधिकार दिल्याने एकूणच पोलिस गोपनीयतेचा भंग झाला आहे. या ‘सायबर एक्सपर्ट’ने पोलिसांच्या कामकाजात प्रचंड ढवळाढवळ करीत, ‘थोरा घरचे श्‍वान’ बनून मोठ्या प्रमाणावर ‘घोडे’बाजार केल्याची पोलिसदलात चर्चा आहे. मात्र अतिवरीष्ठाच्या बदलीनंतर या लाडक्या एक्सपर्टची उचलबांगडी होणार हे निश्‍चित आहे.

सायबर गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. नव-नवीन तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हेगार कोट्यवधीचे गैरव्यवहार करीत आहेत. या गुन्ह्यांची उकल होण्यासाठी पोलिसांना वेगवेगळ्या खासगी ‘सायबर एक्सपर्ट’ची मदत घ्यावी लागते. परंतु, मदतीसाठी आलेले हे ‘सायबर एक्सपर्ट’ अतिवरिष्ठांचे लाडके बनू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने कुठल्याही सायबर तज्ज्ञाला पोलिसांच्या कामकाजात ढवळाढवळ करू नये, तसेच गोपनीयतेचा भाग म्हणून, कोणत्या सायबर एक्सपर्टची मदत घेतली, हे गोपनीय ठेऊन, त्यांना कोणत्याही पत्रकार परिषदांमध्ये सहभागी करून घेऊ नये, असे स्पष्ट केलेले आहे. अशा परिस्थितीत शहरातील एका खासगी ‘सायबर एक्सपर्ट’ला खुलेआम सूट मिळत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

अतिवरिष्ठांचा लाडका बनलेला हा ‘एक्सपर्ट’ आपणच पोलिस आयुक्तालय चालवतो या तोर्‍यात सर्व वरिष्ठांना तुच्छ समजत असतो. त्यामुळेच या एक्सपर्टने अनेक वरिष्ठांना दुखावले असल्याच्या तक्रारी दबक्या आवाजात आहेत. अतिवरिष्ठांच्या मर्जीतून त्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयात जाण्यापर्यंत मजल मारली आहे. या लाडक्या सायबर एक्सपर्ट संदर्भात दै. ‘पुढारी’मध्ये बातमी छापून आल्यानंतर, त्याचा जीव कासावीस झाला आणि त्याने सोशल मिडीयाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. तीन वर्षांपूर्वी नोकरी करीत असलेला हा ‘लाडका’ करोडपती कसा झाला, याचा शोध पोलिसांनाच घ्यावा लागणार आहे. पोलिसांची सायबर संदर्भातील कामे तो फुकटात करतो, असा अतिवरिष्ठांकडून दावा केला जातो; पण स्वतःच्या पोटाची खळगी तो कशी भरतो, परदेश वार्‍या करण्यासाठी त्याच्याकडे पैसा येतोच कुठून, ही बाब गुलदस्त्यातच आहे. विशेष म्हणजे या लाडक्याकडे असलेली ‘सायबर एक्सपर्ट’ची पदवीही बनावट असल्याचे सूत्रांनी सांगितले.या ‘लाडक्या’ने अतिवरिष्ठांच्या मदतीने शहरातील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तो पूर्वी काम करीत असलेल्या कंपनीच्या मालकाच्या विरोधात ही तक्रार होती. या तक्रारीबाबतही त्याने लाखो रुपयांची ‘तोडपाणी’ केल्याची चर्चा आहे.