Fri, Apr 19, 2019 12:41होमपेज › Pune › एकाच दिवशी अनेक बसेस ‘ब्रेक डाऊन’

एकाच दिवशी अनेक बसेस ‘ब्रेक डाऊन’

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:44AMवाघोली : वार्ताहर

पीएमपीएल बसेच्या ब्रेक डाऊनचे प्रमाण वाढले असून प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पीएमपीएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर बसेच्या ब्रेक डाऊनच्या प्रमाणात वाढ झाली असून रोजच अनेक बसेस बंद पडल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना याचा चांगला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.नगर महामार्गावर रोजच एक नव्हे दोन नव्हे तर त्यापेक्षाही जास्त बसेस ब्रेक डाऊन होत असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावतांना मध्येच बंद पडत असल्यामुळे प्रवाशांना यांचा मोठा फटका जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी यांना बसत आहे.

पावसाळ्याचे दिवस आणि त्यातच नित्याचे बस फेल होण्याचे रडगाणे यामुळे तर अजूनच प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे असतांना पीएमपीएल बसेच्या ब्रेक डाऊनचे प्रमाण कमी होते. त्यांची बदली होताच रोजच्या ब्रेक डाऊनने प्रवासी त्रस्त झाले आहेत. निष्काळजीपणे व भरधाव वेगाने बस चालवणे, थांब्यावर बस उभी न करता महामार्गाच्या मध्यभागी अचानकपणे बस थांबवून प्रवाशी घेणे याप्रकारामुळे मागून येणार्‍या वाहनधारकांना धोका पत्करावा लागतो. बेशिस्तपणे बस चालवल्यामुळे नागरिकांमध्ये व चालकांमध्ये वादावादीचे प्रकार नित्याचेच झाले आहे. चालकाची अरेरावी वाढली असून लोणीकंद येथे नगर महामार्गावर दोन दिवसापूर्वीच एका चारचाकी वाहनाला मागून धडक दिल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनाला तक्रार करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी बस चालकाला परवाना व इतर कागदपत्रे मागितले असता त्याच्याकडे नसल्याचे दिसून आले. हा एकाच प्रकार नसून तीन दिवसापूर्वी वाघोली येथे बाजार तळ्याजवळ बसचे ब्रेक फेल झाल्याचे कारण देत दोन दुचाकी बस खाली येऊन नुकसान झाले आहे. सुदैवाने दुचाकीस्वार बालंबाल वाचले. नगर महामार्गावर रोजच बसचे ब्रेक डाऊनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अपघात झाल्यानंतर ब्रेक फेल झाल्याचे कारण सांगितले जाते. सतत ब्रेक फेल होत असतील तर अशा मोडकळीस आलेल्या बसेस बंद करणे गरजेचे आहे. 

सिग्नल तोडणे, वाटेल तिथे बस थांबवणे, मध्येच घुसखोरी करून नियमांचे उल्लंघन करण्यात चालक तरबेज झाले आहेत. संबधित अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या सर्व प्रकाराला मुंढे यांनी आळा घातला होता. मात्र असे अधिकारी लोकप्रतिनिधींना अडचण ठरत असल्यामुळे त्यांच्या बदलीसाठी मोठी उठाठेव करून त्यांची बदली करण्यात आली. नादुरुस्त बसेस असंख्य प्रवाशी घेऊन भरधाव वेगाने धावतात. नादुरुस्त बसेसमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.