होमपेज › Pune › अनेक भागांत अजूनही दमदार पावसाची गरज

अनेक भागांत अजूनही दमदार पावसाची गरज

Published On: Jul 24 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 10:49PMपुणे : सुहास जगताप

गेल्या आठवड्यापासून मान्सूनने जिल्ह्यामध्ये चांगलाच जोर धरला आहे. धरण परिसरात दमदार पाऊस होत असल्याने एका विशिष्ट पातळीत धरण भरल्यानंतर अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात नद्यांना पाणी असले तरी जिल्ह्याच्या मोठ्या भागांमध्ये अजूनही दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी आणि या भागातील ग्रामस्थ मोठ्या पावसाच्या आशेने आकाशाकडे पाहात आहेत. अनेक ठिकाणी अजूनही बंधारे, नाले, तलाव कोरडे आहेत. बहुसंख्य भागात भुरभुर पाऊससुद्धा झालेला नसल्याने चार्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. इंदापूर, दौंड, बारामती, शिरूर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये अनेक भागांत पावसाने ओढ दिलेली आहे. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास वाया गेल्यात जमा आहे. 

दौंड तालुक्यातील रावणगाव परिसरात मोठ्या दमदार पावसाची गरज असून, विहीर, कूपननलिका यांचे स्रोत वारंवार पडणार्‍या हलक्या पावसाने भरले जात नाही. देऊळगाव राजे परिसरातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खडकवासला धारण साखळीत व पुणे परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे भीमा नदी दुधडी भरून वाहत आहे; त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांची उसलागवडीसाठी लगबग सुरू आहे. पाटस परिसरातील रोटी हिंगणीगाडा, वासुदे, पडवी, कुसेगाव या भागांत पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत; पण अजूनही मोठा पाऊस पडला नाही. यामुळे पाऊस पडला नसल्याने या परिसरातील बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहिरी, कूपनलिकातील पाणीपातळी तळाला पोहचली आहे. त्यामुळे शेतीच्या पिकांना पाण्याची गरज आहे. शेतकर्‍यांच्या पेरण्या लांबल्या आहेत.

तर झालेल्या पेरण्यांना पाण्याची नितांत गरज आहे. विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी कमी झाल्याने शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस पडला नाहीतर जनावरांचा चारा व पिण्याचा पाण्यामुळे पशुपालन व्यवसाय करणार्‍या लोकांना याचा तोटा सहन करावा लागेल व पाऊस पडला नसल्याने चारा उपलब्ध न झाल्यास दूध व्यवसायात अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची मोठ्या प्रमाणात आवश्यता आहे. शिरूर तालुक्यातील बेटभागात पिंपरखेड आणि परिसरात ऐन पावसाळ्यातही पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. ओढे-नाले कोरडे असून भविष्यात पिकांना पाण्याची गरज भागण्यासाठी शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. रांजणगाव परिसरात अद्यापपर्यंत पावसाने दडी दिली आहे. मात्र, चासकमान चारीला पाणी आल्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा व पाण्याचा प्रश्न तात्पुरता सुटला आहे. निमोणे परिसरात पावसाअभावी खरिपाचा हंगाम अक्षरशः वाया गेला आहे. परिसरातील पाणवठे आटल्याने सद्य: परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. चासकमानच्या चालू आवर्तनात पूर्ण क्षमतेने टेल भागाला पाणी मिळाले तरच निभाव लागेल; अन्यथा ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंतीशिवाय पर्याय उरणार नाही. शिरूर शहर परिसरात पावसाने ओढ दिल्याने परिसरातील सर्व खरीप पेरण्या वाया गेल्या असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले असून, डिंभे व चासकमानमधून येणार्‍या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी सुटला आहे. गोलेगाव परिसरात बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाने ओढ दिल्याने परिसरातील बाजरी, मूग या खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्या. महाजनमळा येथील गावतळे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत असून येथील विहिरीचीही पाण्याची पातळी खालावली आहे. 

बारामती तालुक्यातील जिरायती उंडवडी-सुपे परिसरात पाऊसच नसल्याने शेतीलाही पाणी नसल्याने पाण्याअभावी पेरण्याही रखडल्या असून जनावरांसाठी चारा हा बागायती भागातून विकत आणावा लागत आहे. मध्यंतरी शिरसाई कालव्याला पाणी सुटल्याने तात्पुरता का होईना, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उंडवडी परिसरातील नागरिकांचा मिटला आहे. लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, कानाडवाडी परिसराला जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, कधीतरी रिमझिम पाऊस पडत आहे व या पावसाने बाजरी पिकाला काहीशा प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे. पण या भागातील विहिरी, तलाव पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरल्यास बाजरी पीक नक्की हाती येईल, अशी परिस्थिती आहे.

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शेळगाव, गोतोंडी, व्याहाळी, पिटकेश्वर, सराफवाडी, शिरसटवाडी, कडबनवाडीसह अन्य भागांतील ओढे-नाले, बंधारे तसेच पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पावसाळा निम्मा संपत आला आहे. यामुळे या भागात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही भागात निर्माण झाला आहे. शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. सध्या निरा डावा कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे; परंतु त्याचा फायदा फक्त शेळगाव, गोतोंडीलगतच्या शेतकर्‍यांना होत आहे. 

कालठण आणि परिसरात अधूनमधून मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मात्र, तरीही या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भवानीनगर परिसरात सतत होत असलेल्या कमी-जास्त पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. अंथुर्णे परिसरात अद्यापही पावसाने दडी मारली असून, शेतीपिके अडचणीत आहेत. निरा डावा कालव्याला पाणी सुरू असले तरी त्या पाण्याचा सध्या तरी फक्त कालव्या जवळच्याच शेतकर्‍यांना फायदा होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. बावडा भागात जमिनीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भीमा व निरा नद्यांना आलेले पाणी व निरा डावा कालव्याचे सुटलेले आवर्तन यामुळे पिकांची परिस्थिती सध्या समाधानकारक असली तरीही पावसाची आवश्यकता आहे. निमगाव केतकी गावाच्या परिसरात पावसाने अद्याप दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतेत असून, सर्वाधिक लागवड होत असलेल्या मका पिकाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. शेतकरी वर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. भोर तालुक्यात भात लावणीचे काम सुरू असून, पाऊस कमी प्रमाणात पडत आहे. पावसाची उघडझाप असल्यामुळे पाण्याच्या पातळी कमी होत आहे. तर भात रोपांच्या तुटवडा शेतकर्‍यांना जाणऊ लागला आहे.