Mon, Nov 19, 2018 14:42होमपेज › Pune › ‘मज आवडते शाळा भारी’

‘मज आवडते शाळा भारी’

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 12 2018 10:54PMदापोडी : संगीता पाचंगे

दापोडीतील गगनगिरी सोसायटीत राहणार्‍या मनप्रीत अहलुवालिया या विद्यार्थिनीने ‘मज आवडते शाळा भारी’ हे विधान खरे करून दाखवले आहे. ऊन असो वा पाऊस एकही सुट्टी न घेता सलग बारा वर्षे शाळेत जाण्याचे रेकॉर्ड मनप्रीत अहलुवालिया या विद्यार्थिनीने केले आहे. याबद्दल खडकीतील सेंट जोसेफ गर्ल्स या इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणार्‍या इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी मनप्रीत अहलुवालिया हिचे खडकी परिसरात कौतुक होत आहे. 

काही वर्षांपूर्वी अहलुवालिया कुटुंबिय दापोडी येथे स्थायिक झाले. दापोडी येथून मनप्रीतला खडकी येथे शाळेसाठी यावे लागत होते. तरीही मनप्रीत शाळेत कधीच गैरहजर राहिली नाही.  वयाच्या 3 वर्षांपासून 14 वर्षापर्यंत 10 वीपर्यंत एकही सुट्टी न घेणारी मनप्रीत ही कदाचित एकमेव विद्यार्थिनी असावी. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिकेने अहलुवालिया यांना पत्रही दिले आहे. गुरुवारी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस होता. शाळेत विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती.

जो तो मनप्रीतचे अभिनंदन करीत होता. खडकी शहरात ही बातमी वार्‍यासारखी पसरली. अनेकजण मनप्रीतच्या आई-वडीलांचे अभिनंदन करत होते. मनप्रीतला स्वीमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. तिला आयएएस ऑफीसर बनायचे आहे. यासंदर्भात वडिल चरणजित सिंग व आई जसलिन म्हणाले की,  मी आज शाळेत जाणार नाही, असे कधीच मनप्रीत म्हणाली नाही.  ती अगदी आजारी पडली तरी रात्री गोळी घेऊन दुसर्‍या दिवशी शाळेत जात असे. दहावीपर्यंत शाळेचा एकही खाडा न केल्याबद्दल खडकी छावणी परिषदेकडून 26 जानेवारीला मनप्रीतचा सत्कार करण्यात आला. तसेच, शाळेकडून आदर्श विद्यार्थी या पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले. तिला शिक्षिका चित्रा खारकर यांनी मार्गदर्शन केले.