Thu, Mar 21, 2019 11:14होमपेज › Pune › चुलत्यानेच केला पुतण्याचा घात

चुलत्यानेच केला पुतण्याचा घात

Published On: Mar 12 2018 12:53AM | Last Updated: Mar 12 2018 12:35AMनिमगाव केतकी : प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे मनोहर विठ्ठल मस्के (वय 32, रा. भरणेवाडी, ता. इंदापूर) या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून 11 फेब्रुवारीला खून करण्यात आला  होता.  या घटनेतील   मयताचा चुलता  फिर्यादी महादेव कोंडिबा मस्के (वय 49, रा. भरणेवाडी, ता. इंदापूर ) यास खुनाच्या संशयावरून शनिवारी (दि.10) रात्री उशिरा इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी भरणेवाडीतून अटक केली. रविवारी (दि.11) इंदापूर येथील न्यायालयात हजर केले असता त्यास  16 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  फिर्यादीच आरोपी निघाल्याचे समोर आल्याने इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

आरोपी महादेव मस्के त्याचा पुतण्या  मयत मनोहर मस्के, मेहुणे अंकुश व त्याचा भाऊ लहू भोंग यांनी निमगाव केतकी हद्दीतील  शिखरवळण  परिसरातील गट क्र. 751 मधील 14  एकर शेती सन 2005 मध्ये घेतली होती. याच  शेतीतील डाळिंब राखणीला  मनोहर आला असता त्याच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. या खुनाचा तपास  तातडीने लावावा यासाठी  श्वानपथकाची मागणी करून ते येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा  पवित्राही  नातेवाईकांनी त्यावेळी घेतला होता. तसेच महिना होत आला तरी घटनेचा तपास लागत नसल्याने पोलिसांवर दबावतंत्र वापरले जायचे.  तो  तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी ही मागणी त्यांचे  घरातील व  गावकरी  मंडळी करत होते. यात फिर्यादी महादेव मस्केही सहभागी असायचा. 

याबाबत पोलिस निरीक्षक हंकारे म्हणाले की, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता; मात्र मारेकर्‍याने मागे कुठलाच पुरावा न ठेवल्याने  खुन्यापर्यंत पोचणे अवघड होते. यासंदर्भात 10 मार्चला मयत मनोहर मस्के यांच्या आईने व्यक्त केलेल्या संशयावरून फिर्यादी महादेव मस्के यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.