Mon, May 27, 2019 07:52होमपेज › Pune › आंबा उत्पादक शेतकरी ‘आर्थिक पेचात’

आंबा उत्पादक शेतकरी ‘आर्थिक पेचात’

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी

केरळ, कर्नाटक येथून येणार्‍या आंब्याला ओखी वादळाचा फटका बसला असून रत्नागिरीच्या हापूसला हवामानाचा फटका बसला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक पेचात सापडला असून पाडव्यापाठोपाठ आता अक्षय तृतीयाचाही मुहूर्त सर्वसामान्यांच्या हातातून जाणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रत्नागिरीचा हापूस डझनाला 200 ते 300 रुपयांनी महाग बसणार असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली.

गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळ विभागात आंब्याचा हंगाम जोरात सुरु असला तरी त्याला हवामानाचा फटका बसला आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांना ही भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत बाजारामध्ये फक्‍त 25 ते 30 टक्केच रत्नागिरीचा तयार हापूस असून दोन दिवसावर आलेल्या अक्षय तृतीयेला सर्वसामान्यांच्या हातातून हा सणही जाणार आहे.

बाजारात आलेल्या रत्नागिरीच्या 4 ते 8 डझनाला तब्बल 2000 ते 4500 रुपये भाव  मिळाला असून डझनाला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला आहे. गेल्या वर्षीच याच हंगामामध्ये 4 ते 8 डझनाला 1200 ते 2500 रुपये तर डझनाला 300 ते 700 रुपये भाव मिळाला होता. बाजारामध्ये केरळ आणि कर्नाटक आंब्याची केवळ 15 ते 20 टक्केच आवक असून रत्नागिरी हापूसची 25 टक्केच आवक होत आहे. गेल्यावर्षी याच हंगामामध्ये रत्नागिरी हापूसची 10 ते 12 हजार पेट्यांची तर यावर्षी केवळ 3 हजार पेट्यांची आवक झालेली आहे. मद्रास, बंगलोर आणि कर्नाटक आंब्याची गेल्यावर्षी तब्बल 50 हजार पेट्यांची आवक होती. परंतू यावर्षी ही आवक केवळ 7 ते 10 हजार पेट्या दररोज येत आहेत. तयार हापूसचा तुटवडा असून अक्षय तृतीयेला तो अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वच राज्यातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर होईल. मद्रास, कर्नाटक, केरळ, रत्नागिरी आणि स्थानिक आंब्याची आवक होणार असून त्यामुळे आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार आहेत. त्याचा फटका पुन्हा शेतकर्‍यांनाच बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक पेचात सापडला आहे. 

अक्षय तृतीयाचा मुहुर्त हुकणार : युवराज काची

सध्याच्या परिस्थितीत रत्नागिरी हापूसला हवामानाचा फटका बसला असून दररोज केवळ तीन हजार पेट्यांचीच आवक होत आहे. त्यामुळे भाव वाढलेले असले तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या हातातून हा मुहुर्त मात्र हुकला आहे. पाडवा आणि अक्षय तृतीया या दोन्ही सणांना सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखता येणार नाही. दि. 25 एप्रिलनंतर सर्वच राज्यातील आंबा बाजारात एकाच वेळी दाखल होणार आहे. त्यामुळे सर्वच आंब्याचे दर कोसळणार असून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

Tags : Pune, Mango, farmer, financial, crisis