Sun, Jul 12, 2020 21:33होमपेज › Pune › मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल

मंगलदास बांदल यांच्यावर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल

Published On: Jul 16 2019 1:06PM | Last Updated: Jul 16 2019 1:06PM
शिक्रापूर : वार्ताहर 

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर आठ दिवसांपूर्वी शिरूर येथे अपंग महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यानंतर मंगलदास यांच्यावर शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री दि. १५ जुलै रोजी फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख किरण ऊर्फ किशोर गायकवाड यांनी ही फिर्याद दिली आहे. दहा वर्षांपुर्वीचा हा गुन्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशाने दाखल करण्यात आला.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण (ता. शिरूर) येथील किशोर देशमुख यांनी खंडाळे (ता. शिरूर) येथील २१ गुंठे जमीन खरेदी केलेली होती. देशमुख यांना काही व्यावसायिक अडचणीमुळे जमीन विक्री करायची होती. त्यावेळी देशमुख यांचे मित्र मंगलदास बांदल यांनी ही जमीन मलाच घ्यायची असून तुझी जमीन मी घेतो असे सांगितले होते. यानंतर पंधरा दिवसांनी बांदल यांनी देशमुख यांना शिक्रापूर येथे जमिनीचा व्यवहार सत्तावीस लाख रुपयांना ठरला होता, तर बांदल यांनी देशमुख यांना मी सांगेल त्या दिवशी तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आपण जमिनीचे खरेदीखत करू आणि तुला तेव्हा लगेच सगळे पैसे देऊन टाकतो असे सांगितले होते. 

त्यांनतर १९ मे २०१० रोजी मंगलदास बांदल यांनी देशमुख यांना जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे बोलाविले. त्यांना दुय्यम निबंधक कार्यालयासमोर श्रीकांत विरोळे व राहुल टाकळकर हे दोघे भेटले. यावेळी त्यांनी देशमुख यांना मंगलदास बांदल हे येथे येणार नसून तुमची जमीन श्रीकांत विरोळे यांच्या नावावर करून द्यायची आहे असे सांगितले.  

यानंतर मात्र देशमुख यांनी बांदल यांना फोन करून विचारले असता, बांदल यांनी सांगितले की, श्रीकांत विरोळे हा माझा जवळचा आणि विश्वासू सहकारी आहे. ते सांगतील तशी जमीन त्यांच्या नावावर करून दे. मी दोन दिवसांनी तुला ठरलेली रक्कम देतो असे ते म्‍हणाले. त्यावेळी देशमुख यांनी बांदल यांच्या सांगण्यावरून ही जमीन श्रीकांत विरोळे यांच्या नावावर करून दिली.

त्यांनतर देशमुखानी वेळोवेळी फोन करून आणि भेटूनही पैसांची मागणी केली. परंतु बांदल यांनी टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर देशमुख यांनी वेळोवेळी श्रीकांत विरोळे व राहुल टाकळकर यांना सांगितले, परंतु त्यांनी देखील प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आपली जमीन विक्रीत फसवणूक झाली असल्याचे किशोर देशमुख यांच्या लक्षात आले. 

त्यांनतर किशोर व्यंकटराव देशमुख यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. यावरून शिक्रापूर पोलिसांनी मंगलदास विठ्ठलराव बांदल, श्रीकांत ज्ञानोबा विरोळे दोघे (रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि पुणे), राहुल वसंत टाकळकर (रा. हिवरे ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे हे करत आहेत.