Wed, Apr 24, 2019 08:13होमपेज › Pune › मांडूळ तस्कर जाळ्यात 

मांडूळ तस्कर जाळ्यात 

Published On: Dec 05 2017 1:44AM | Last Updated: Dec 05 2017 1:27AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने अंधश्रद्धेच्या बाजारात जिवंत मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातील दोन मांडूळ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली. गणेश वाफगावकर (वय 18) आणि राजू शिळीमकर (वय 40) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून, त्यांच्यावर वन्यजीव कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात दोन जण मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पोलिस नाईक श्रीकांत वाघवले व इरफान मोमीन यांना  मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनरक्षक स्वाती खेडकर व संभाजी धनावडे यांना माहिती दिली. उपनिरीक्षक कदम आणि गुन्हे शाखा एकच्या पथकाने कात्रज चौकात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये 1 किलो 500 ग्रॅम आणि 1 किलो 400 ग्रॅम वजन असलेले दोन मांडूळ आढळले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. 

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय कापरे, पोलिस उपनिरीक्षक हर्षल कदम, दिनेश पाटील, पोलिस नाईक श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, इरफान शेख, सचिन जाधव, तुषार खडके, पोलिस हवालदार रिजवान जिनेडी, उमेश काटे, प्रकाश लोखंडे, राजू पवार, अशोक माने, मेहबूब मोकाशी, राजाराम सुर्वे, सुभाष पिंगळे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.