Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Pune › कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार मराठीतून व्हावा

कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार मराठीतून व्हावा

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 10 2018 11:44PMपुणे : राज्य शासनाने आदेश दिल्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयासह  महापालिका, नगरपालिका,तसेच प्राधिकरणाच्या कार्यालयात मराठी भाषेतून फलत तसेच पत्रव्यवहार करणे बंधकारक केले आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा कारभार देखील मराठीतून करण्यात यावा अशी  मागणी आता या भागातील नागरिक करू लागले आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट  बोर्डाचा कारभार मागील सुमारे दोनशे वर्षापासून (म्हणजे ब्रिटीश काळापासून) इंग्रजी भाषेतून चालत आहे.तसेच कॅन्टोन्मेट कायदा वेगळा आहे. रोजच्या प्रशासनात मुख्य कार्यकारी अधिकारी हा मुख्य घटक असतो.तर  लष्करातील ब्रिगेडिअर किंवा  मेजर जनरल पदावरील व्यक्ती  बोर्डाची अध्यक्ष असते. याबरोबरच जनतेमधून निवडून आलेले  नगरसेवक सुध्दा  बोर्डाचा कारभार चालवित असतात. बोर्ड प्रशासन हे केंद्र शासनाच्या  संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा कारभार हा  इंग्रजी तसेच हिंदी भाषेतून चालतो.परंतु,हद्दीत राहणारे नागरिक दैनंदिन जीवनात तसेच व्यवहारात मराठी भाषेचा वापर जास्त करीत आहेत. मात्र कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा कारभार इंग्रजी भाषेतून चालत असल्याने कित्येक नागरिकांना  इंग्रजी येत नाही. परिणामी प्रशासनाकडून काही नोटीस तसेच प्रशासनात संवाद साधावयाचा असल्यास अनेक अडचणी निर्मान होतात. विशेष म्हाजे  बोर्डाची सर्वसाधारण सभेची विषयपत्रिकाही इंग्रजीतच तयार केलेली असते. त्यामुळे नगरसेवकांनाही अनेकदा अडचणी येत असतात.  

‘राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे कँटोन्मेंट बोर्डास आता मराठी भाषेतून कामकाज करावे लागणार आहे.तसेच सर्व कामकाज लवकरात लवकर मराठीमधून करण्यात  यावे असे मत या भागातील  कार्यकर्ते संजय कवडे यांनी व्यक्त केले, तर ‘बोर्डाच्या आठही वॉर्डांमध्ये मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बोर्डाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यास हरकत नाही’, अशी प्रतिक्रीया नगरसेवकांनी  व्यक्त केली.याबाबत प्रतिक्रिया देताना कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.डी.एन.यादव म्हणाले,“ बोर्ड प्रशासन हे  केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या  अखत्यारीत येत आहे. कामकाजासाठी  इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. परंतु;  कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील  नागरिकांशी असलेला संवाद , तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांशी केला जाणारा पत्रव्यवहार मराठी भाषेतून देण्यावर भर असतो.मात्र  पुढील काळात बोर्डाच्या प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेतून करण्यावर भर देण्यात येईल.