Thu, Jul 18, 2019 08:12होमपेज › Pune › तळेगावात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या

तळेगावात कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तळेगाव : प्रतिनिधी 

तळेगाव-चाकण रस्त्यालगत माळवाडी येथे इंदोरीतील युवकाचा कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रोशन उर्फ ढंप्या बाळू हिंगे(१८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळी पावणेनऊच्या सुमारास रोशन दुचाकीवरुन जात असताना पाठीमागून आलेल्या एका मारुती ८०० कारने त्याला मागून धडक दिली. गाडीवरुन खाली पडल्यानंतर तो पळत असताना त्याचा पाठलाग करत कोयत्याने सपासप वार करुन खून करण्यात आला.

घटनेनंतर याठिकाणावरुन जाणाऱ्या एका कारमधील युवकांनी रोशनला तळेगावच्या रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्यामुळे त्याला सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी रोशनचा मित्र सुनील कैलास कदम (१९) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद हिंगोले, हवालदार अनिल भोसले यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेत तपासाला सुरुवात केली आहे. 

भरवस्तीत खुनाच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सदर घटनेमागे इंदोरीतील गतकाळातील गुन्हेगारी घटना आणि पूर्ववैमनस्य आदींचा काही संबंध आहे का? याचाही पोलिस तपास करत आहेत.

 

Tags : Man Murdered, Talegaon, Malwadi,Pune, Crime, Pune Police


  •