Wed, Apr 24, 2019 02:09होमपेज › Pune › ‘स्थायी’च्या अध्यक्षपदी भाजपच्या गायकवाड

‘स्थायी’च्या अध्यक्षपदी भाजपच्या गायकवाड

Published On: Mar 08 2018 1:20AM | Last Updated: Mar 08 2018 12:41AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या ममता विनायक गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोरेश्‍वर भोंडवे यांचा 11-4 असा 7 मतांनी पराभव केला. त्या पालिकेच्या 34 व्या अध्यक्षा ठरल्या आहेत. राष्ट्रवादीसोबत असणार्‍या शिवसेनेने ऐनवेळेस तटस्थ भूमिका घेतली. 

समिती अध्यक्षपदाची निवडणूक पीठासीन अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या नियंत्रणाखाली बुधवारी (दि.7) मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने दंड थोपटल्याने त्याकडे शहराचे लक्ष लागले होते. गायकवाड यांचे सर्व 5 अर्ज वैध ठरले, तर दोन्ही अर्जांवर सूचक व अनुमोदक एकच असल्याने भोंडवे यांचा एक अर्ज बाद झाला. एकानेही माघारी न घेतल्याने खोडवेकर यांनी निवडणूक जाहीर केली. 

प्रथम ममता गायकवाड यांच्यासाठी समितीच्या 16 सदस्यांमध्ये मतदान घेण्यात आले. त्यांच्या बाजूने भाजपचे 10 व अपक्ष 1 असे धरून सर्व 11 सदस्यांनी हात वर करून मतदान केले. त्यात सदस्यपदाचा राजीनामा देणारे आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव व निष्ठावंत गटाचे शीतल शिंदे यांनीही मतदान करून पक्षनिष्ठा कायम ठेवली. गायकवाड, सागर आंगोळकर, नम्रता शिंदे, विलास मडिगेरी, उत्तम केंदळे, लक्ष्मण उंडे, निर्मला कुटे, मोनिका कुलकर्णी, अपक्ष कैलास बारणे यांनी मतदान केले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भोंडवे, राजू मिसाळ, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर या 4 सदस्यांनी मतदान केले. शिवसेनेचे अमित गावडे हे तटस्थ राहिले. गायकवाड या विजयी झाल्याचे खोडवेकर यांनी जाहीर केले. 

गायकवाड या समितीच्या 34 व्या अध्यक्षा ठरल्या आहेत. मावळत्या अध्यक्षा सीमा साळवे यांच्यानंतर त्या दुसर्‍या मागासवर्गीय महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे पहिले मागासवर्गीय अध्यक्ष झाले होते. 

समिती अध्यक्षपदी गायकवाड यांची निवड झाल्याने त्यांचे महापौर नितीन काळजे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अभिनंदन केले. या वेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आदी उपस्थित होते. गायकवाड यांच्या समर्थकांनी पालिका परिसरात जल्लोष करीत फटाके फोडले. गायकवाड यांचा प्रभाग असलेल्या वाकड परिसरात दिवसभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

शिवसेनेची तटस्थ भूमिका वादात 

राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्‍वर भोंडवे यांचा अर्ज दाखल करताना शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व समिती सदस्य अमित गावडे हे दोघे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत शिवसेनेने भोंडवे यांना पाठिंबा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते; मात्र आज प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी शिवसेनेचे गावडे यांनी राष्ट्रवादीला मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली. शिवसेनेने अचानक घूमजाव केल्याने त्यांच्या संशयास्पद भूमिकेची पालिका वर्तुळात चर्चा रंगली होती. 

आमदार जगताप गटाची सरशी

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी गायकवाड यांनी एकमेव अर्ज भरल्याने त्या पदासाठी तीव्र इच्छुक असलेले आमदार महेश लांडगे गटाचे राहुल जाधव यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या पदाचा अडसर ठरत असल्याने महापौर नितीन काळजे यांनीही राजीनामा दिला; तसेच क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. या राजीनामा अस्त्रामुळे  भाजपतील गटातटाचे राजकारण उफाळून आले होते. अखेर त्यावर पक्षश्रेष्ठींनी पडदा टाकत सर्वांची नाराजी दूर केल्याचे आजच्या निवडीवरून स्पष्ट झाले. गायकवाड यांच्या निवडीमुळे आमदार जगताप गटाची सरशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष गायकवाड यांच्या अभिनंदनाच्या वेळी महापौर, आमदार लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे आवर्जून उपस्थित होते.