Fri, Apr 26, 2019 09:55होमपेज › Pune › प्रवेश परीक्षांचे योग्य नियोजन करा

प्रवेश परीक्षांचे योग्य नियोजन करा

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:47AMपुणे : प्रतिनिधी 

रविवारी झालेल्या ‘नीट’ परीक्षेतील पर्यवेक्षकांच्या तुघलकी निर्णयावर विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करताना योग्य नियोजन झालेच पाहिजे, असे अनेकांनी सांगितले. नियमाला धरून कारवाई करण्यास काही हरकत नाही मात्र, शर्टच्या कॉलर फाडण्यासारखे प्रकार करणे ही अतिशयोक्ती असल्याने मत त्यांनी ‘पुढारी’कडे स्पष्टपणे नोंदविले.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत शहरातील विविध केंद्रांवर गोंधळ उडाल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रकाशित करून ‘नीट’ परीक्षा देताना विद्यार्थ्यांना बसलेल्या तुघलकी कारभार चव्हाट्यावर आणला होता. ‘पुढारी’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना अनेक पालक तसेच विद्यार्थ्यांनी संपर्क करून अडचणींचा पाढाच वाचला. नीट बरोबरच अन्य प्रवेश परीक्षांचे देखील विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

इंदापूरमधून लोहगाव या ठिकाणी आलेले एक पालक म्हणाले, केंद्रावर पालकांना साधे बसण्याची देखील व्यवस्था नव्हती. तर पाणी पीण्यासाठी देखील कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परीणामी तेथील पाणी विक्रेत्यांनी एरवी 15 ते 20 रूपयांना विकली जाणारी पाण्याची बाटली 35 ते 40 रूपयांना विकून, पालकांची अर्थिक लूट केली. त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षांचे आयोजन करत असताना ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांचा विचार करून त्यांना योग्य त्या सुविधा सबंधित यंत्रणेकडून उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तर परीक्षा दिलेल्या एका विद्यार्थ्यांने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जरी नियमावली जाहीर केली असली तरी, विद्यार्थ्यांचे कपडे फाडणे हे कोणत्या नियमात बसते, असा प्रश्‍न उपस्थित केला.

त्यातही कॉलरसंदर्भात नियमावलीत कसलाही उल्लेख नसताना कॉलर कापण्याचे काय कारण होते, असा सवालही या विद्यार्थ्याने उपस्थित केला. ज्या विद्यार्थ्यांकडे जास्तीचे कपडे नाहीत. जे विद्यार्थी गरीब घरातून आलेले आहेत, त्यांनी काय करायचे. असे अतिरेकी निर्णय घेण्यापेक्षा परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून काळजी घेता आली नसती का, असेही काही विद्यार्थ्यांनी सुचविले.परीक्षेसाठी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या अनेक पालकांनी अशा प्रकारच्या विविध परीक्षांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचे अत्यंत हाल होत असून, एमएचटी सीईटी, नीट, जेईई अशा प्रकारच्या अन्य प्रवेश परीक्षांचे आयोजन करत असताना संबंधित यंत्रणेकडून योग्य ते नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगत विद्यार्थीभिमुख कार्यप्रणाली राबविण्याची मागणी पालकांनी केली.