Wed, Jul 24, 2019 05:43होमपेज › Pune › ‘मिनी’नंतर आता ‘मेजर हनी मिशन’

‘मिनी’नंतर आता ‘मेजर हनी मिशन’

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:20AMपुणे : शंकर कवडे

देशात मधक्रांती आणण्याच्या उद्देशाने पाऊल टाकलेल्या केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातीतील शेतकर्‍यांसाठी ‘मेजर हनी मिशन’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. तरुणांना, विशेषत: शेतकरी वर्गाला मधक्षेत्राकडे आकर्षित करून मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्याच्या हेतूने हे मिशन आखण्यात आले आहे. त्याअंतर्गत  राज्यातील शेतकर्‍यांना मधनिर्मिती व मधव्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

‘मिनी’ मिशनअंतर्गत शेतकर्‍यांना अत्याधुनिक मधपेट्या व सातेरी मधमाशांचे अवघ्या 1 हजार 500 रुपये डिपॉझिट घेऊन वाटप करण्यात आले. राज्यासह देशाच्या मध उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने हे मिशन यशस्वी ठरल्यानंतर केंद्राने आता ‘मेजर हनी मिशन’ची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत अनुसूचित जाती जमाती गटातील लाभार्थी शेतकर्‍याला मधपेटीसह ‘एपिस मेलिफेरा’ जातीच्या मधमाशा, मध काढतेवेळी तोंडावर लावण्यात येणारी जाळी, धुर फवारणी, हातमोजे यासह पेटी ठेवण्यासाठी स्टॅण्ड देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थी शेतकर्‍याला दहा पेट्या देण्यात येणार असून, त्यासाठी लाभार्थ्याला डिपॉझिट स्वरूपात फक्त 9 हजार रुपये भरावे लागणार आहेत. 

याबाबत संस्थेचे संचालाक डॉ. आर. के. सिंह म्हणाले, मेजर हनी मिशनद्वारे लाभार्थ्यास केंद्रीय मधमाशा संशोधन संस्था जवळपास 70 ते 75 हजार रुपयांचे साहित्य माफक दरात उपलब्ध करून देणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 100 नागरिकांना प्रत्येकी दहा याप्रमाणे 1 हजार कॉलनीचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्राकडून 19 लाख 5 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असून, मधक्रांती यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, उपक्रमाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍याला अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास त्याकडील मधपेट्या जमा करून त्या इतरांना मागणीनुसार देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.  

मेजर हनी मिशनसाठी नोंदणी सुरू

अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील शेतकर्‍यांसाठी मेजर हनी मिशनसाठी नोंदणी सुरू झाली आहे. शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये 31 मार्चपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. त्यासाठी लाभधारक शेतकर्‍याला आधार कार्ड, मध क्षेत्रातील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, जात प्रमाणपत्र आदी जमा करावे लागणार आहे. 

अशी असते मधपेटी

आकर्षक घराच्या आकाराच्या असलेल्या मधपेटीत दोन दालने असतात. एक खालचे वंश संगोपनाचे दालन (पिलाव्याची कोठी) आणि दुसरे वरचे, जे जादा मध साठविण्याचे दालन असते. यामधील काढता घालता येणार्‍या लाकडी चौकटीत मधमाशा मेणाची पोळी बांधतात. दोन दालनांचे वर एक तळपाट असते व वर छप्पर असते. खालच्या दालनात मधमाशांचा वंश असतो व वरचे दालन सर्वस्वी मध साठविण्याकरिता वापरले जाते. पोळ्यातून मध काढून घेतल्यानंतर रिकामी झालेली पोळी पुन्हा भरण्यासाठी त्या दालनात ठेवली जातात.