Tue, May 21, 2019 04:04होमपेज › Pune › आंबा महोत्सवामधील ६३ स्टॉल आगीत खाक

आंबा महोत्सवामधील ६३ स्टॉल आगीत खाक

Published On: May 04 2018 1:38PM | Last Updated: May 04 2018 1:38PMपुणे / बिबवेवाडी : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभागाच्या वतीने मार्केट यार्ड येथील पणन कार्यालयाच्या आवारात आयोजित केलेल्या आंबा महोत्सवातील एका स्टॉलच्या मंडपाला शुक्रवारी दुपारी आग लागल्याने तेथील 63 स्टॉल जळून भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या 6 बंब आणि 2 टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नसून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

शेतकरी (उत्पादक) ते ग्राहक योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभागाकडून आंबा महोत्सव-2018 चे आयोजन करण्यात आलेले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून पणन मंडळ कार्यालयाच्या आवारात हा महोत्सव सुरू होता. या महोत्सवात कोकण परिसरातील रत्नागिरी, देवगड, रायगड, दापोली, सिंधुदुर्ग, केळशी, उडपडक, रत्नवासुधारा परिसरातील 70 ते 75 आंबा उत्पादक (शेतकरी) उद्योजकांनी सहभाग घेतलेला होता. आंबा स्टॉलवर कोकणातील हापूस, केशर, तोतापुरी, पायरी, दशेरी, चौउस या प्रकारचे आंबे विक्रीसाठी आणले होते.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी स्टॉलच्या पूर्व दक्षिण कोपर्‍यातील एका स्टॉलच्या मंडपाने अचानक पेट घेतला; तसेच तेथे आगीमुळे कापडी मंडप खाली पडल्याने आग भडकली. स्टॉल्समध्ये कापडी मंडप, लाकडी आंबा खोकी, टिपल्या, सुकलेले गवत यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले आहे. आग विझविण्यासाठी पणन इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा असूनही तिचा उपयोग करता न आल्याने इतर स्टॉल्सनीही पेट घेतला. आंबा स्टॉलधारकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने ती विझवता आली नाही. त्यानंतर अग्निशमन दलाचे 6 बंब आणि 2 टँकरनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते. 

मनपाच्या 42 जवान, 6 अग्निशमन बंब, 2 पाणी टँकरच्या मदतीने अग्निशमन प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. विझविण्याचे काम पाहिले. आंबा 63 ते 65 स्टॉलवर 70 ते 80 आंबा पेट्या असल्याची माहिती आंबा शेतकरी (उत्पादक) यांनी दिली. आग लागल्यानंतर शेतकर्‍यांनी काही प्रमाणात आंबा बाहेर हलविला; मात्र मोठ्या प्रमाणात आंबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथे आलेल्या शेतकर्‍यांच्या जेवणाची व्यवस्था पणन मंडळ कार्यालयात करण्यात आली असल्याची माहिती जे. जे. जाधव यांनी दिली. 

शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी....

या आंबा महोत्सवात दोन दिवसांपूर्वीच मालाची आवक झाली होती. पुणे शहर मोठे मार्केट असल्याने ग्राहकांच्या मागणीनुसार चांगला आंबा मागविण्यात आला होता. बाहेर देशात जाणारा माल पुण्यात आला होता, पण आगीचे संकटाने मोठे नुकसान केले. मुलाबाळांना घेऊन धंद्यासाठी आलोय, पण मोठे नुकसान झाले, आता शासनाने आम्हाला मदत केली पाहिजे, अशी मागणी आंबा व्यापारी मुजावर शेख (दापोली), अरविंद देसाई (रत्नागिरी), योगेश कदम (देवगड), बाळू शिरस व निलेश कुदळे(रायगड), बालकृष्ण सुर्वे (उराशी,देवगड) यासह अनेक आंबा शेतकर्‍यांनी केली.

Major Fire, Fire Breaks Out, Amba Mahotsav, Pune