Sun, Jul 21, 2019 14:09होमपेज › Pune › महेश लांडगे यांच्यावर अजित पवार ‘मेहरबान’

महेश लांडगे यांच्यावर अजित पवार ‘मेहरबान’

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:03AMपिंपरी : संजय शिंदे 

माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी कट्टर समर्थक आणि पुण्याचे नगरसेवक बाबुराव चांदोरे यांना डावलून राज्य कबड्डी संघटनेवर सदस्य म्हणून भाजपचे सहयोगी आ. महेश लांडगे यांना संधी  दिली.  पवारांची लांडगे यांच्याशी जवळीक ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच असल्याची चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात रंगली आहे.

गेल्या आठवड्यात राज्य कबड्डी संघटनेवर पुणे जिल्ह्यातून अजित पवार, महेश लांडगे आणि शकुंतला खटावकर यांची वर्णी लागली. राज्य कबड्डी संघटनेवर अजित पवारांचे वर्चस्व आहे. पवारांच्या सुचनेवरूनच निवड करण्यात येते हे सर्वश्रुत आहे. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेतून तिघांची निवड राज्य संघटनेवर होते. पवार यांच्याबरोबरीने शांताराम जाधव आणि बाबुराव चांदोरे यांची निवड होईल असे वाटत असतानाच अनपेक्षितपणे लांडगे आणि खटावकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने सर्वांनाच पवारांनी आश्चर्याचा धक्का दिला. चांदोरेंऐवजी लांडगे यांच्या निवडीमागे भविष्यातील राजकारण दडल्याचे स्पष्ट होत आहे.

लांडगे हे कमळ चिन्हावर निवडून आलेले नाहीत. ते अपक्ष असल्याने  भाजपचे सहयोगी सदस्य झाले आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात जरी त्यांचे समर्थक नगरसेवक कमळ चिन्हावर निवडून आले असले तरी महेशदादा हा आमचा पक्ष आहे असे ते छातीठोकून सांगत असल्याने लांडगे यांना शहराच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. 
राष्ट्रवादीची  पिंपरी-चिंचवड शहरातील  पत पुन्हा प्राप्त करण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष दिल्यामुळे आक्रमक दत्ता साने यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे. विविध प्रश्नांच्या माध्यमातून भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत.

शिरूर लोकसभा आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांच्याच मुशीत तयार झालेल्या लांडगे यांना खेळाडू म्हणून राज्य संघटनेवर काम करण्याची संधी देऊन अप्रत्यक्षरित्या एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न पवार यांनी केल्याची जोरदार चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आहे. 

भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांना टार्गेट करत आ.लांडगे यांना मात्र राष्ट्रवादीकडून सॉफ्ट कॉर्नर केले जात असल्याचे राष्ट्रवादीचेे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. त्याचाच भाग म्हणून क्रीडा क्षेत्रात आपल्या बरोबरीने काम करण्याची संधी पवारांनी लांडगे यांना दिली आहे.