Mon, May 20, 2019 08:39



होमपेज › Pune › सदस्य निवडीत लांडगेंचे विरोधकांना धोबीपछाड

सदस्य निवडीत लांडगेंचे विरोधकांना धोबीपछाड

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 26 2018 11:39PM



पिंपरी : संजय शिंदे

स्थायी अध्यक्ष पदाच्या निवडीचा अनुभव लक्षात घेऊन काही झाले तरी तीनही क्षेत्रीय कार्यालयांवर आपल्याच समर्थकांना स्वीकृत सदस्य करण्यात आ. महेश लांडगे यशस्वी झाले आहेत. 

माझ्या मतदारसंघात माझाच निर्णय अंतिम आहे हे दाखविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे निष्ठावंत म्हणून छाती बडविणार्‍यांना  भोसरी भाजपा म्हणजे मी हे सिद्ध करत पक्षांतर्गत विरोधकांना व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लांडगे यांच्यावर निशाणा साधणार्‍या विरोधकांना ‘धोबीपछाड’ मारण्यात आ. महेश लांडगे यशस्वी झाले आहेत.

आ. लांडगे यांच्या भोसरी मतदार संघात क, फ आणि ई अशी तीन क्षेत्रीय कार्यालये येतात. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर तीन सदस्य निवडीवरून भाजपंतर्गत जोरदार रस्सीखेच सुरू होती. नवीन आणि निष्ठावंत अशा वादाने सर्वांचे भोसरीकडे लक्ष लागले होते. काही झाले तरी 9 जागेवर आपल्याच समर्थकांना संधी देण्यासाठी आ. लांडगे आक्रमक झाले होते. आपल्या समर्थकांनाच न्याय मिळावा, यासाठी लांडगेंनी कंबर कसली होती. तर जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून पालिका पक्षनेते एकनाथ पवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत होते. 

परंतु माझ्या मतदारसंघात मी सांगितलेली नावेच अंतिम झाली पाहिजेत असा व्होरा लांडगे यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनापुरे, शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांच्याकडे धरला होता. 

बुधवारी (दि.25) रात्रीपर्यंत नाव निश्चितीवरून वादंग सुरू होता. मी दिलेलीच नावे अंतिम झाली पाहिजेत असे सांगून आ. लांडगे बैठकीतून बाहेर पडले. त्यांनी दिलेल्या 9 जागा पैकी 8 जागेवर सागर हिंगणे, गोपीकृष्ण धावडे, अजित बर्डे, साधना तापकीर, विजय लांडे, दिनेश यादव, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर यांना संधी देण्यात आली आहे.

फक्त ‘क’मध्ये राजेश पिल्ले समर्थक वैशाली खाडे यांना संधी देण्यात आली. या निर्णयावरून आ. लांडगे यांचा पक्षात दबदबा असल्याचे निश्चित झाल्याने पक्षांतर्गत व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करणार्‍या विरोधकांनाही आ. लांडगे यांनी धोबीपछाड दिल्याचे स्पष्ट झाले आहे.