होमपेज › Pune › आ. महेश लांडगेंच्या ‘डॅशिंग’ प्रतिमेस धक्का

आ. महेश लांडगेंच्या ‘डॅशिंग’ प्रतिमेस धक्का

Published On: Mar 11 2018 1:03AM | Last Updated: Mar 10 2018 11:09PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीत आपले समर्थक राहुल जाधव यांना डावलले जाऊनही, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने ‘डॅशिंग नेता’ या त्यांच्या प्रतिमेस धक्का बसला आहे. 

आमदार लांडगे हे मूळचे राष्ट्रवादीचे. विधानसभेला वारंवार डावलले गेल्याने त्यांनी सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. सर्वपक्षीय नाराजांच्या पाठिंब्यावर विजयही मिळवला आणि पुढे भाजपचे संलग्न सदस्यत्व स्वीकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातला ते ताईत बनले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2017 च्या निवडणुकीत भोसरी पट्ट्यातून त्यांनी पक्षाचे 30 नगरसेवक निवडून आणले; मात्र पहिल्याच वर्षी आपले समर्थक नितीन काळजे यांना महापौरपद मिळवून देण्यासाठी आमदार लांडगे यांना संघर्ष करावा लागला. महापौरपदासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नामदेव ढाके यांचे नाव पुढे होते; मात्र प्रसंगी राष्ट्रवादीशी युती करून वेगळे काही घडविण्याचा इशारावजा संदेश आ. लांडगे यांनी पक्षश्रेष्ठींपपर्यंत पोचवला. परिणामी, ढाके यांचा पत्ता कट झाला आणि काळजे यांना महापौरपदी संधी मिळाली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आ. जगताप समर्थक सीमा सावळे यांची, तर पक्षनेतेपदी एकनाथ पवार यांची वर्णी लागली. 

आ. महेश लांडगे व शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप हे दोघेही मंत्रिपदाचे दावेदार असल्याने त्यांच्यात सुप्त संघर्ष जाणवला; मात्र पालिकेत समाविष्ट गावांतील 425 कोटींच्या विकासकामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी व शिवसेनेने केला. भाजपचे खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याने खा. साबळे व सावळे यांच्यात वाद पेटला. त्या वेळी आ. लांडगे यांनी सीमा सावळे यांना ‘क्लीन चिट’ दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. भोसरी विधानसभा मतदारसंघात ज्यांना स्वपक्षाचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही ते विकासकामांना विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी खा. शिवाजीराव आढळराव यांचे नाव न घेता केली.

समाविष्ट गावांकडे राष्ट्रवादीने 20 वर्षे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. पालिका निवडणुकीमुळे गेल्या वर्षी अर्थसंकल्पास उशीर झाला, कामांना उशीर झाला. त्या वेळी कामे होत नाहीत म्हणून ओरडणारे आता कामे सुरू केली, तर भ्रष्टाचार झाला म्हणून ओरडत आहेत; पण आम्ही टीकेला भीक घालत नाही, असे सांगत आ. लांडगे यांनी सावळे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. विरोधकांनी सावळे यांची धास्ती घेतली आहे. सावळे, सारंग कामतेकर यांनी यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता, त्यामुळे त्या वेळी पोळलेले सावळे यांच्यावर आरोप करत आहेत; पण आम्ही सारे सावळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे लांडगे यांनी सांगितले तेव्हाच आ. जगताप, आ. लांडगे, सावळे युतीची चर्चा होती. पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपद निवडणुकीत याचे प्रत्यंतर आले. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल जाधव, विलास मडिगेरी व शीतल शिंदे यांच्या नावांची चर्चा होती; पक्षातील जुने निष्ठावंत मडिगेरी यांच्यासाठी एकवटले. 

आ. लांडगे यांनी राहुल जाधव, तर आ. जगताप यांनी शीतल शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरल्याची चर्चा होती; मात्र जगताप यांनी ममता गायकवाड यांचे नाव ऐनवेळी पुढे आणून सर्वांना धक्का दिला. भाजपत या धक्कातंत्राची प्रतिक्रियाही उमटल्याचे दिसले. महापौर नितीन काळजे, ‘स्थायी’साठी डावलले गेलेले राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी राजीनामे दिले; मात्र महापौरांचा राजीनामा ही आ. जगताप यांनी आ. लांडगे यांना हाताशी धरून केलेली खेळी होती, हे स्थायी समिती अध्यक्षपद निवडणूक निकालाने सिद्ध झाले.

राजीनामा दिलेले महापौर अजून पदावरच आहेत, राहुल जाधव ‘स्थायी’च्या मतदानात भाग घेतात हे नाट्य पाहून शहरवासीयांचे चांगलेच मनोरंजन झाले. आ. लांडगे यांच्या भरवशावर मोरेश्‍वर भोंडवे यांना रिंगणात उतरवलेल्या राष्ट्रवादीच्या पदरी  निराशाच आली; मात्र याहीपेक्षा आ. महेश लांडगे यांनी या निवडणुकीत घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे ‘डॅशिंग नेता’ या त्यांच्या प्रतिमेस धक्का पोचला आहे.