Thu, May 23, 2019 14:41
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › सामाजिक संदेशासह महात्मा फुलेंना अभिवादन

सामाजिक संदेशासह महात्मा फुलेंना अभिवादन

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:33AMपुणे : प्रतिनिधी

मुलींचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण... स्त्रियांना द्या इतका मान, की वाढे आपल्या देशाची शान... द्या शिक्षणाला गती, व्हा फुले सावित्री... नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही... अशा विविध सामाजिक संदेशासह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 191 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. निमित्त होते युवा माळी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन यात्रेचे.

येथील युवा माळी संघटनेसह राज्यातील विविध माळी समाज संघटनांतर्फे समतावादी विचारांचा जयघोष करत शोभारथाने या अभिवादन यात्रेला प्रारंभ झाला. या अभिवादन यात्रेचे उद्घाटन भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, प्रितेश गवळी, बापू भोसले, युवा माळी संघटनेच्या अध्यक्ष सुनिता भगत, सचिव वृषाली शिंदे, उपाध्यक्ष क्षमा धाडगे उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या भिडेवाड्यापासून ते गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापर्यंत ही अभिवादन यात्रा काढण्यात आली. ही अभिवादन यात्रा भिडेवाडा येथून सुरू होऊन रामेश्वर चौक दत्तमंदिर मार्गे, मंडई, शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी, खडकमाळ मार्गे गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा येथे पोहोचली. या अभिवादन यात्रेत डॉक्टरांचे पथक, स्वच्छता पथक आणि शालेय विद्यार्थ्यांचे पथक देखील यात सहभागी झाले होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारे नागरिक, बालक, ज्येष्ठ आणि महिला देखील या अभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अभिवादनयात्रेत पुणे, पिंपरी-चिंचवड, माळीनगर, सासवड, वाई, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगाव अशा विविध शहरातील माळी संघटना सहभागी झाल्या होत्या. अभिवादन यात्रेच्या समारोपानंतर महात्मा फुले वाडा येथे ‘मी सावित्री फुले बोलतेय..’ हा एकपात्री प्रयोग गायत्री लडकत यांनी सादर केला.