Fri, Jul 19, 2019 20:13होमपेज › Pune › मॉरिशसचे मराठी कुटुंब पोहोचले खंडोबाच्या दर्शनाला

मॉरिशसचे मराठी कुटुंब पोहोचले खंडोबाच्या दर्शनाला

Published On: Apr 05 2018 9:56AM | Last Updated: Apr 05 2018 11:11AMजेजुरी : वार्ताहर

सन 1864 मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले, गायकवाड व परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन, राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहेत. या परिवारातील सुमारे 30 सदस्यांनी जेजुरीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले असून, शनिवारी (दि. 7) ते स्वतः खंडेराया व अंबाबाईचा जागरण-गोंधळ, तळी-भंडार, लंगर तोडणे, खंडोबाची-देवीची गाणी, जात्यावरची गाणी भारुड सादर करून मराठी परंपरा व धार्मिक संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत.

सन 1864 मध्ये सातारा जिल्ह्यातील पाली (पेंबर) नजीकच्या गावातील लक्ष्मण भोसले, गायकवाड व त्यांचे सहकारी बोटीवर खलाशी म्हणून काम करताना मॉरिशस येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांच्याकडे
कुलदैवत खंडेरायासह तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरच्या अंबाबाईचे टाक होते. मॉरिशसमध्ये स्थायिक होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना देश सोडला तरी या कुटुंबियांनी आपली धार्मिक मराठी परंपरा सोडली नाही. मॉरिशसमध्येही या कुलदैवतांचे सर्व सण उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जात आहेत. हीच परंपरा सध्याच्या पाचव्या पिढीने म्हणजेच अनिल भोसले ,लक्ष्मण, त्यांची पत्नी मीनाक्षी भोसले-लक्ष्मण, वृशांत म्हाडकर-गायकवाड, मल्हारी आबाजी परब, जयश्री रामा आबाजी परब, प्रशिक शिकानंद हिरू पवार, मनीषा हिरू राघू पवार, राजेंद्र कुमार पंडू पंढरकर, हिराबाई लखना आदींनी जोपासली आहे.

सध्या या परिवारातील सुमारे 30 सदस्य भारतात आलेले असून तुळजापूर, कोल्हापूर, नेवासा-चंदनपुर व खंडोबाच्या 11 स्थळांना भेटी देत आहे. सध्या या परिवाराचा निवास जेजुरीतील जेष्ठ नेते दिलीप बारभाई यांच्याकडे आहे. आपआपल्या व्यवसायात स्थिर व आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेल्या अनिल भोसले लक्ष्मण व वृशांत म्हाडकर गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले की, सुमारे 150 वर्षांपूर्वी मराठा समाजातील आमचे पूर्वज मॉरिशस येथे स्थायिक झाले असले तरी, त्यांनी येथील धार्मिक विधी, सण, उत्सवांची परंपरा जोपासली होती. तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत.

मॉरिशसची लोकसंख्या 12 लाख असून, सुमारे 30 हजार मराठी परिवार तेथे स्थायिक झालेला आहे. आमच्या कुटुंबामध्ये आषाढी-कार्तिकी एकादशी, गणपती उत्सव, महाशिवरात्री आदी उत्सवांसह खंडोबाचे सोमवती अमावस्या, पौष, माघ, चैत्रपौर्णिमा, चंपाषष्ठी उत्सव साजरे केले जातात. स्वतःचे गारमेंट (कापड दुकान) असलेले अनिल भोसले व त्यांची पत्नी मीनाक्षी जेजुरीप्रमाणेच खंडोबाचे वर्षातील उत्सव, धार्मिक विधी तेथे साजरे करताना वाघ्या-मुरुळी म्हणून कार्य करतात. मात्र हा व्यवसाय म्हणून नव्हे तर श्रद्धा म्हणून करतात.

उच्चपदस्थ अधिकारी असलेले वृशांत पंढरकर हे सुद्धा देवाचा वाघ्या बनतात. जागरण गोंधळ करताना देवाला लागणारी हळद (भंडारा) जात्यावर दळली जाते. यावेळी जात्यावरच्या ओव्यांपासून विधींना सुरुवात होते, तद्नंतर जागरण-गोंधळ, पारंपरिक गीते व लंगर तोडणे, तळी भंडार आदी विधी केले जातात. देवाची भूपाळी, आरत्या, लोकगीते, अभंग आदी भोसले परिवाराला मुखोद‍्गत आहेत. जेजुरीप्रमाणेच चंपाषष्ठी उत्सव सहा दिवस साजरा केला जातो.

मॉरिशसमध्ये फ्रेंच आणि आफ्रिका मिळून क्रिओल भाषा बोलली जात असली तरी मराठी बांधव शुद्ध मराठीतून बोलतात. तेथील शाळेत 50 मिनिटांचा मराठीचा तास घेतला जात असून, त्यामध्ये महापुरुषांचा इतिहास, मराठी देवदेवता, सण, उत्सवांचे महत्व आदी शिकवले जाते, अशी माहिती तेथील मराठीच्या शिक्षिका हिराबाई लखना यांनी दिली. भोसले यांच्या मॉरिशस येथील जगदंबे निवास या ठिकाणी खंडोबा व तुळजाभवानी मंदिर आहेत. श्री मार्तंड देवसंस्थान विेशस्त मंडळाकडून मॉरिशसवासीय मराठी परिवाराची भेट घेत त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच शनिवारी (दि. 7) त्यांच्या हस्ते पहाटेची भूपाळी आरती घेण्यात येणार आहे. सायंकाळी या परिवारातील सदस्य जय मल्हार सांस्कृतिक भवनमध्ये जात्यावरची ओवी, जागरणगों धळ, तळीभंडार, देवीच्या आरत्या आदी विधीतून लोककलेचे व धार्मिक परंपरेचे दर्शन घडवणार आहेत. देवसंस्थानकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

Tags : Marathi, Family, Moritious, India