Wed, Apr 24, 2019 16:17होमपेज › Pune › पुणे: एकट्या 'युवराज'साठी शिक्षकाचा 50 किलोमीटर खडतर प्रवास

पुणे: एकट्या 'युवराज'साठी भरते शाळा

Published On: Mar 25 2018 1:33PM | Last Updated: Mar 25 2018 2:53PMपुणे: पुढारी ऑनलाईन

तब्बल 50 किलोमीटरचा प्रवास, त्यातील 12 किलोमीटर डोंगराळ भागातील कच्चा रस्ता. ज्याच्या एका बाजूला 400 फूट खोल दरी... गेली आठ वर्षे 29 वर्षीय रजनीकांत मेंधे हा धोकादायक प्रवास करत आहे. ते ही केवळ एका विद्यार्थ्यासाठी... होय, वाचून तुम्हाला धक्का बसेल. शिक्षणाचा आणि शिक्षकांचा बाजार मांडलेला असताना ही बातमी नक्कीच आश्वासक आहे. पण तितकीच गंभीर आहे.  

पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर जवळच्या चंदर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मेंधे शिक्षक आहेत. गावात केवळ 15 घरे असून लोकसंख्या 60 इतकी आहे आणि शाळेतील विद्यार्थी संख्या केवळ एक आहे. गेल्या 8 वर्षांपासून मेंधे या शाळेत शिकवत आहेत.

शाळेत पोहचल्यानंतर मेंधे यांचे पहिले काम असेत ते त्यांच्या एकमेव विद्यार्थ्याचा शोध घेणे. बहुतेक वेळा तो झाडांवर लपून बसलेला असताना मी त्याला शाळेत घेवून येतो.  तर काही वेळा तो घरात असतो. युवराज शिक्षण घेण्यास फार उत्सुक असतोच असे नाही. पण मी ही गोष्ट समजू शकतो. तो त्याच्या मित्रांसोबत शाळेला येत नाही. अशा परिस्थितीत कोण त्याला शिकवण्यासाठी पुढाकार घेईल?, असा प्रश्न गेली आठ वर्षे धोकादायक मार्गावरून शाळेत पोहचणाऱ्या मेंधेनी केला. 

गावात पोहचण्यासाठी मेंधेंना एक तास लागतो. गावाच्या जवळ असलेल्या महामार्गावरून एक कच्चा डोंगराळ रस्ता लागतो. येथून धोकादायक प्रवास करत ते शाळेत पोहचतात. मेंधेची खरी अग्निपरीक्षा पावसाळ्यात असते. या रस्त्यात पूर्ण चिखल झालेला असतो. पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण आणि धोकादायक असल्याचे ते म्हणाले. 

मुळचे नागपूरचे असलेले मेंधे यांची आठ वर्षापूर्वी या गावात शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा शाळेत  एकूण 11 विद्यार्थी होते. माझ्याकडे खुप हुशार विद्यार्थी होते. पण त्यातील अनेक जण पुढील शिक्षणासाठी या शाळेतून दुसरीकडे गेले. येथून 12 किलोमीटर अंतरावर शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. काही मुली देखील येथे शिक्षण घेत होत्या. पण त्यांना शेत काम अथवा कारखाण्यात रोजंदारीवर काम करण्यासाठी गुजरातला पाठवण्यात आले.  मी या सर्व मुलींना शाळेत पाठवण्यासाठी त्यांच्या पालकांकडे अनेक वेळा विनंती केली. पण त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे मेंधेंनी सांगितले. 

या गावात 1985 मध्ये शाळा सुरु करण्यात आली. अनेक वर्षे शाळेच्या इमारतीला छप्पर देखील नव्हते. गेल्या काही दिवसांपूर्वी एक छत बसवण्यात आले आहे. अर्थात मेंधे यांच्या समोरची संकटे काही कमी होत नाहीत. एका रात्री शाळेतील छतावरून साप माझ्या अंगावर पडला. काही दिवसांपूर्वी मातीच्या रस्त्यावरून येताना मोटरसायकलवरून मी सापावर पडलो. आता मला वाटत नाही मी तिसऱ्यावेळी अशा कोणत्या घटनेतून वाचू शकेन, असे मेंधे यांनी सांगितले.

जिद्द सोडली नाही

अनेक अडचणी आणि अडथळे असून सुद्धा मेंधे यांनी जिद्द सोडलेली नाही. काही वायरची जुळवाजुळव करून त्यांनी एक छोटा टीव्ही आणला आहे. ज्यामुळे शाळेत ई-लर्निंग  सुरू करता येईल. गमतीचा भाग म्हणजे गावात अद्यापही वीज पोहचली नाही. सरकारने दोन वर्षांपूर्वी गावकऱ्यांना 12 व्हॅल्टचे सोलर पॅनेल दिले आहेत. त्यातील वीज वापरून मी ई-लर्निंगचे काही भाग टिव्हीवर डाऊनलोड करतो. युवराजला शिक्षणात आवड निर्माण व्हावी म्हणून मी दोन टॅबलेट घेतल्याचे मेंधे म्हणाले.  अन्य मुलांसाठी शाळा म्हणजे नव्या गोष्टी शिकण्याबरोबरच मित्रांसोबत खेळ, धम्माल करणे देखील असते. पण युवराजसाठी शाळा म्हणजे चार भिंती आणि रिकामी बाके असतात, असे मेंधेंनी सांगितले.   

विकास दूर दूर पर्यंत नाही...

गावात विकास म्हणून काहीच झालेले नाही. येथील लोक जनावारे आणि दगड तोडण्याच्या कामातून दोन पैसे कमवतात. बबन सांगळे (49 वर्ष) आईची देखभाल करण्यासाठी मुंबईतील नोकरी सोडून गावी परतले आहेत. ते म्हणाले, गावात काहीच नाही. रॉकेलचा वापर करून आम्ही रात्री दिवे लावतो. सरकारने दिलेले सोलर दिवे एक वर्षापूर्वीच बंद पडले आहेत. आता एक सोलर दिवा शिल्लक आहे. त्यातून आम्ही मोबाईल फोन चार्ज करतो, असे बबन म्हणाले. गावात आरोग्य सुविधा देखील नाही.  सर्वात जवळचे रुग्णालय 63 किलोमीटर अंतरावर आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेला प्रचंड ताप आला. डोंगराळ भाग असल्यामुळे बांबूच्या मतदीने गावकरी तिला दवाखान्यात घेऊन जात होते. पण वाटेतच तिचा मृत्यू झाल्याचे एका महिलेने सांगितले. सर्व तरुण कामाच्या शोधात बाहेर पडले आहेत. आता गावात फक्त वयस्कर लोक शिल्लक आहेत. 

सुप्रिया सुळेंच्या मतदासंघातील गाव.. एकदाही आल्या नाहीत...

हे गाव खासदार सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात येते. पण त्यांनी कधीही या गावाला भेट दिली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिओ लसीकरणासाठी सरकारी अधिकारी येथे शेवटचे आल्याचे एकाने सांगितले. 

मेंधेंनी केला आहे बदलीसाठी अर्ज

जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या मेंधेंनी येथे रुजू झाल्यानंतर पाच वर्षांनी बदलीसाठी अर्ज केला होता. मात्र, अन्य कोठेही जागा रिक्त नसल्याने त्यांची अद्याप बदली झाली नाही. 

मेंधे एकटे नाहीत...

या गावाजवळ असलेल्या अशाच दुसऱ्या एका शाळेत मनोज अंदुरे शिक्षक आहेत. मुळचे अहमदनगरचे अंदुरे हे देखील मेंधे यांच्याप्रमाणे त्यांच्या शाळेत एकटेच शिक्षक आहेत. ज्या धोकादायक रस्त्यावरून मेंधे येतात त्याच मार्गावरून अंदुरे देखील प्रवास करतात. दिलासा देणारी एक बाब म्हणजे त्यांच्या शाळेत 9 विद्यार्थी आहेत. मेंधे गेली 8 वर्षे येथे आहेत हा एक मोठा चमत्कारच असल्याचे अंदुरे म्हणाले.  

दोन्ही शिक्षकांनी घरच्यांना अंधारात ठेवले...

दोन्ही शिक्षक खानापूर येथे कुटुंबासह राहतात. हे अंतर शाळेपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही दोन्ही शिक्षकांनी घरच्यांना आमची शाळा किती दुर्गम भागात आहे याची माहिती दिली नाही. शाळेबद्दल आणि येथील परिस्थितीबद्दल सांगितले तर ते काळजी करतील. आम्ही दोघेही फार कमी सुट्ट्या घेतो. अन्य ठिकाणापेक्षा या भागात नोकरी करणे शिक्षकांसाठी फार अवघड असल्याचे अंदुरे म्हणाले. 

युवराजचा एकमेव मित्र कोल्हापुरला गेला...

हे दोन्ही शिक्षक येथील सोई-सुविधा याबद्दल बोलत असताना शाळेतील एकमेव विद्यार्थी असलेला युवराज एका कोपऱ्यात शांत बसला होता. त्याचा सर्वात जवळचा मित्र गेल्याच वर्षी कोल्हापुरला गेला. गावातील अनेक कुटुंब शहरात स्थलांतर करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युवराज एका मित्रापासून दुर झाला. मी आणि रोहित फुटबॉल खेळायचो. येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत तो गावाकडे येईल तेव्हा आम्ही पुन्हा फुटबॉल खेळू असे युवराज निरागसपणे बोलला.

(Photo credit: Aditya Waikul)

Tags : Maharashtra, Teacher, Ranjinikant Mendhe,  Chandar