Wed, Jun 26, 2019 11:21होमपेज › Pune › माओवाद्यांकडून महाराष्ट्र टार्गेट

माओवाद्यांकडून महाराष्ट्र टार्गेट

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:39AMपुणे ः प्रतिनिधी

शनिवार वाड्यावरील एल्गार परिषद माओवाद्यांचा विचार पसरविण्यासाठीच आयोजित करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्र ‘टार्गेट’ केले आहे. याबाबतचे पुरावे पोलीसांकडे आहेत, हे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील उज्वला पवार यांनी बुधवारी येथील न्यायालयात केला. 

दरम्यान, सीपीआय (माओवादी) या बंदी असणार्‍या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या तिघांना येथील न्यायालयात हजर केल्यावर हा युक्तीवाद करण्यात आला. 

दरम्यान, या आरोपींना 5 सप्टेंबरपर्यर्ंत त्यांच्या घरीच नजर कैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, असे  विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी सांगितले. 

एल्गार परिषदेप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या  पी. वरवरा राव (वय 78, रा. तेलंगणा), वर्णन स्टॅनिसलॉस गोन्साल्वीस (वय 61, रा. अंधेरी, पुर्व मुंबई) आणि अरूण थॉमस फरेरा (रा. बांद्रा मुंबई) यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

तरुणांना संघटित करून त्यांना माओवादी संघटनेत सहभागी करण्याचे काम अरुण फरेरा हा करत असल्याचे जप्त केलेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केला. एल्गार परिषद ही माओवाद्यांचे विचार पसरविण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. बंदी असलेल्या सिपीआय या माओवादी संघटनेला पैसे पुरविण्याचे काम, तसेच देश विघातक कृती करण्यासाठी कोणती शस्त्रे खरेदी करायची हा निर्णय घ्यायचा पुर्ण अधिकार वरवरा राव याला होता. नेपाळ आणि मणिपूर येथून 4 लाख राऊंड खरेदी करण्याबाबत राव हा येथील कॉम्रेडबरोबर बोलणी करीत होता. कोणती शास्त्र खरेदी करायची, याबाबत एक कॅ टलॉग तयार केला होता. त्यातील निवडक शस्त्र खरेदी करण्याचे अधिकार राव याला देण्यात आले होते, असे जप्त कागदपत्रातून स्पष्ट झाले आहे. संघटनेकडून महाराष्ट्र हे राज्य टार्गेट केले होते. पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोकण या ठिकाणी आपले विचार रुजविण्याचे प्रयत्न संघटना करीत होती. त्याच दृष्टीने पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, असा युक्तिवाद पवार यांनी केला. आरोपींच्या सखोल चौकशीसाठी त्याना 14 दिवस कोठडी देण्याची मागणी पवार यांनी केली.

कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार दोन गटतील वाद होता. त्याचा माओवादी संघटनेशी काही संबंध नाही, असे असताना माझ्या अशिलांना त्यात गोवण्यात आले आहे. तसेच त्यांना ज्या कलमांखाली अटक करण्यात आली, तसा त्यांचा काही दोष नाही त्यामुळे त्यांना कोठडी देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. बचाव पक्षाकडून वकील अ‍ॅड. रोहन नहार, अ‍ॅड. तौसिफ शेख व अ‍ॅड. कुमार काळे पाटील यांनी काम केले.

आज न्यायालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रे ही चार महिन्यापूर्वी जप्त करण्यात आलेली आहेत. आतापर्यत आम्ही पुणे पोलिसांना पूर्ण सहकार्य केले असून, आमच्या कस्टडीची गरज नाही, अशी विनंती अरूण फरेरा यांनी न्यायालयाला केली. काल सकाळी 6 वाजता पोलीस माझ्या घरी आले. सहा ते सात घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर अटक वॉरंटवर सही घेण्यात आली. हे वॉरंट मराठीमध्ये असल्यामुळे मला समजले नाही. त्यानंतर मला अटककरण्यात आली. माझ्या बायकोचा  मोबाईल जप्त करण्यात आला, असे वरवरा राव याने न्यायालयात सांगितले.

नोटा बंदीमुळे पैसे पोहचविण्यास उशीर

युक्तिवादवेळी सरकारी पक्षाकडून जप्त कागदपत्रांपैकी 9 पत्रे न्यायालयात वाचण्यात आली. त्यातील एक पत्र राव आणि सुरेंद्र गडलिंग यांच्यात झालेल्या संवादाचे होते. गडचिरोली आणि बस्तर येथील कॉम्रेडला पैसे न मिळाल्याने तेथील कारवाया थंडावल्या होत्या. त्यामुळे राव यांनी गडलिंग यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यास उत्तर देताना गडलिंग याने लिहिलेल्या पत्रात नमूद होते की, नोटाबंदी झाल्याने वाहनांची ठिकठिकाणी तपासणी करण्यात येत आहे, त्यामुळे पैसे पुरविण्यास उशीर झाला. मात्र बस्तरमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे सरकार हादरले आहेत. तसेच मोठा हल्ला करण्याबाबत आपले निर्देश संबंधिताना पोचवण्यात आले आहेत.

न्यायालयात कडेकोट बंदोबस्त

पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. त्यातील आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्यामुळे सकाळपासूनच शिवाजीनगर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़  न्यायालयाच्या मुख्य गेटपासून थेट न्यायालयाच्या खोलीपर्यंत सर्वत्र पोलीस दिसत होते़  न्यायालयात येणार्‍या प्रत्येकाकडे विचारपूस करूनच आत सोडले जात होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच सुमारे 150 पोलिसांचा ताफा दिवसभर तैनात होता़