Mon, Jun 17, 2019 18:46होमपेज › Pune › महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिखाव्यापुरतेच

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिखाव्यापुरतेच

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 10:57PMपिंपरी : पूनम पाटील

शहरात नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील पर्यावरणाचा दिवसेंदिवस र्‍हास होत असून हवा, जल, ध्वनी, मृदा, प्रकाश हे सर्वच घटक प्रदूषणाने ग्रासले गेले आहेत. त्यामुळे वाढते प्रदूषण ही समस्या औद्योगिक नगरीला भेडसावत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दिखाव्यापुरतेच उरले असल्याचे चित्र आहे.

या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे. मात्र सद्यःस्थितीत  कारवाई अत्यल्प असून प्लास्टीक बंदीबाबतही मंडळातर्फे नाममात्र कारवाई केली आहे.  मंडळातर्फे गुढीपाडव्यापासून आतापावेतो केवळ तीन कंपन्यांवरच कारवाई केली आहे.  मंडळाकडे हवा, पाणी, जैविक कचरा, घनकचरा अशा विविध घटकांमधील प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, सद्यस्थितीत मंडळ त्यांची जबादारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहे. शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे.

याबाबत मंडळाची भूमिका महत्वाची असूनही याकामी मंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थाकडे बोट दाखवले आहे. स्थानिक पातळीवर पालिकेच्या अखत्यारीत हे काम येत असल्याचे सांगत मंडळ जबाबदारी झटकत असल्याचे दिसत आहे. पालिका व मंडळाचा परस्पर समन्वयाचा अभाव असून आजवरची कारवाई पहाता प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमके काय काम करते, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

मंडळाकडे पर्यावरण संवर्धनाची देखील जबाबदारी आहे. सद्यःस्थितीत मंडळाकडे तीनच फिल्ड ऑफिसर असून ते पुरेसे असल्याचा दावा मंडळाने केला आहे. मंडळातर्फे प्रदूषण रोखणे, नागरी व औद्योगिक क्षेत्रातील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, कचरा विल्हेवाट प्रकल्प, हवा शुद्धीकरण यासंदर्भातील आराखडे, प्रकल्पांचा पाठपुरावा करणे अपेक्षित होते. परंतु  प्रदूषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता प्रदूषण नियंत्रणात  प्रदूषण नियंत्रण मंडळ पूर्णत: अपयशी ठरत आहे. 

नोटिसा बजावण्यापलीकडे कारवाईच नाही

शहरातील नद्यांना गटारगंगेचे स्वरूप आले असून रोजच अनेक कंपन्यांद्वारा थेट नद्यांमधे रसायनयुक्त पाणी सोडले जाते. अशा कंपन्यांना नोटिसा बजावण्यापलीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच कारवाई करताना दिसत नाही. मध्यंतरी रासायनिक द्रव्य प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्याबाबत महापालिका सकारात्मक होती. मात्र हा सेवेज ट्रिटमेंट प्लँट आता केवळ कागदोपत्रीच उरला असून मंडळाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील प्रदूषण पातळीत वाढ झाली आहे. याला मंडळ जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणमित्रांनी केला आहे.