होमपेज › Pune › पुण्याला फटकारले, कोल्हापूरचे कौतुक

पुण्याला फटकारले, कोल्हापूरचे कौतुक

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 02 2018 12:40AMपुणे : 

स्मार्ट सिटी आणि मेट्रोसारखे प्रकल्प आपण करत आहात; पण पाणीप्रदूषण रोखण्यासारख्या  प्राथमिक कामाबाबत तुम्हाला गांभीर्य नाही. तुम्ही इतर गावांना प्रदूषित पाण्याची शिक्षा देत आहात, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एस. के. श्रीवास्तव यांनी पुणे महापालिकेची खरडपट्टी केली. याच वेळी लहान शहर असूनही कोल्हापूर महापालिकेने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे कोल्हापूर, पुणे, सांगली, पिंपरी-चिंचवड, सोलापूर येथील महापालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत सांडपाण्याच्या प्रश्‍नासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी श्रीवास्तव यांनी हे कौतुक केले. 

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि मेट्रोसिटी होणार्‍या पुण्यात निर्माण होणार्‍या सांडपाण्यापैकी 50 टक्के पाणी, कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीत मिसळत आहे. यावर श्रीवास्तव यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. पुण्यात 744 एमएलडी सांडपाण्यापैकी केवळ 342 एमएलडी पाण्यावर प्रकिया होते. उर्वरित पाणी थेट नदीत मिसळत असताना, महापालिकेला कसलेही गांभीर्य नाही. महाराष्ट्रातील नदी प्रदूषणामध्ये पुणे अग्रभागी आहे. या मुळे ग्रामीण भागातील नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठे प्रकल्प राबविण्यात मश्गुल असणार्‍या पुणे महापालिकेला याबाबत गांभीर्य कसे नाही, अशा शब्दांत श्रीवास्तव यांनी अधिकार्‍यांचा समाचार घेतला.

कोल्हापूरचे काम चांगले
तुलनेने लहान असणार्‍या कोल्हापूर महापालिकेने पंचगंगा नदी प्रदूषणासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल श्रीवास्तव यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचे कौतुक केले. महापालिका क्षेत्रात निर्माण होणार्‍या 97 एमएलडी पाण्यापैकी 72 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात पालिकेला यश आले आहे. यासाठी कसबा बावडा आणि दुधोळी नाला येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आली आहेत; तर पंपिंंग स्टेशन झाल्यानंतर लवकरच ही क्षमता वाढून 89 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी योजना मंजूर असून, 2020 पर्यंत शंभर टक्के पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. शेतीचे खतमिश्रित पाणी, साखर कारखान्यांची मळी, इचलकरंजीसारख्या शहरातील कापड उद्योगातून तयार होणारे रासायनिक पाणी, तसेच काठच्या गावांचे सांडपाणी, या मुळे पंचगंगेचे प्रदूषण वाढले असताना हे काम निश्‍चितच कौतुकास्पद असल्याचे या वेळी श्रीवास्तव यांनी नमूद केले.

या बैठकीला श्रीवास्तव यांच्यासह प्रादेशिक अधिकारी वाय. बी. सोनटक्के, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पुणे महापालिकेचे प्रमोद उंडे, डॉ. केतकी घाटगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.