Sat, Jul 20, 2019 21:54होमपेज › Pune › मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन

मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:51PMपुणे : प्रतिनिधी

श्री स्वयंभू मेंगाई देवीच्या 371 व्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व वेल्हे येथील देवस्थान ट्रस्ट, वेल्हे तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवरील मल्लसम्राट महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे सरचिटणीस प्रदीप भोसले, वेल्हेच्या सरपंच कल्पना भेगडे, माउली मांगडे आणि राजाभाऊ रायरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही स्पर्धा गुरुवार, दि. 8 ते शनिवार दि. 10 फेब्रुवारी यादरम्यान भोर तालुक्यातील वेल्हे येथे तोरणा गडाच्या पायथ्याशी होणार आहे. या स्पर्धेत 57 किलो, 61 किलो, 65 किलो, 70 किलो, 74 किलो, 86 किलो आणि 84 ते 120 खुला गट सहभागी होणार आहे. लहान गटात 25 किलो, 30 किलो, 36 किलो, 42 किलो आणि 50 किलो वजनी गट असतील. याशिवाय महिलांसाठी आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्त्या घेण्यात येणार आहेत. खुल्या गटातील विजेत्याला जीप गाडी; तर उपविजेत्याला बुलेट देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते दि. 8 रोजी दुपारी 4 वाजता होणार असून, समारोपाला दि. 10 रोजी सायंकाळी 6 वाजता क्रीडामंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कर्नल संभाजी पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या स्पर्धेला आजी-माजी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यपातळीवरील मल्ल उपस्थित राहणार असून, इतर वजनी गटातील विजेत्यांनाही पारितोषिक प्रदान केले जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.