Tue, Apr 23, 2019 22:32होमपेज › Pune › महानगरपालिकेकडून महामेट्रोची अडवणूक

महानगरपालिकेकडून महामेट्रोची अडवणूक

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 13 2018 1:09AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

महामेट्रोकडून महानगरपालिकेकडे मेट्रोच्या स्टेशन्स, माहिती केंद्र, पार्किंग आदींसाठी शहरातील विविध जागांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र महानगरपालिकेकडून आत्तापर्यंत मागितलेल्या जागांपैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. मेट्रोला भाडे तत्त्वावर दिलेल्या जागांसाठीही अव्वाच्या सव्वा दर आकरण्यात येत असून एक प्रकारे महानगरपालिकेकडून महामेट्रोची लुटच करण्यात येत आहे. 

नागपूर मेट्रोच्या धर्तीवर पुण्यातही मेट्रो माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. मेट्रोच्या डब्याची प्रतिकृती आणि त्यात शहरात पुर्ण करण्यात येणार्‍या मेट्रो प्रकल्पाची माहिती याठिकाणी देण्याचे नियोजन आहे.  यासाठी  तीन गुंठे जागा आवश्यक असून, महामेट्रोने शहरातील तीन जागा महापालिकेला सुचविल्या होत्या. मात्र, महापालिका जागा देताना आडमुठेपणा दाखवत आहे.

शहरातील पेशवे पार्क येथील तीन गुंठा जागा माहिती केंद्रासाठी महामेट्रोने मागितली होती मात्र महानगरपालिकेने एक गुंठाच जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र एका गुंठा जागेत नियोजित माहिती केंद्राचे काम शक्य नसल्याने महामेट्रोने पुन्हा एकदा तीन गुंठे जागा मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. अथवा महामेट्रोला दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. या जागेसाठी जुन 2017 पासून पाठपुरावा करण्यात येत असून, अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही असे महामेट्रोच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. 

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील पौड रस्त्यावर तयार करण्यात आलेले सहयोग केंद्र सध्या भाडेतत्तावर घेतलेले असून त्यासाठी पुणे महानगरपालिका तब्बल 18 हजार मासिक भाडे आकारत आहे. अशाप्रकारे जागांच्या संदर्भात महामेट्रोला महानगरपालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याचेच सध्या तरी म्हणता येईल. 

कसे असेल माहिती केंद्र 

पुणेकरांना  शहरात कशा प्रकारची मेट्रो धावणार आहे, तिचे मार्ग कसे असणार आहे, हे पाहता यावे यासाठी मेट्रो माहिती केंद्र  उभारण्यात येणार आहे. या सेंटरमध्ये मेट्रोच्या डब्याची प्रतिकृती, मेट्रोचे मार्ग, मेट्रोचे पूल, भुयारी मार्ग या सर्व गोष्टींची माहिती लावण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेंटरला भेट द्यावी, जास्तीत जास्त नागरिकांना मेट्रोची माहिती मिळावी, यासाठी ज्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ जास्त असते, अशा ठिकाणी हे सेंटर उभारणे आवश्यक आहे. 

केंद्रासाठी 3 गुंठे जागा आवश्यक

जून 2017 पासून मेट्रो माहिती केंद्रासाठी  जागा मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे. त्यासाठी तीन जागा सुचविल्याही  होत्या. महामेट्रो पालिकेकडे भाडेतत्त्वाने तीन गुंठे जागा मागत आहे. संभाजी उद्यान, पेशवे उद्यान, सणस ग्राऊंडजवळील मोकळी जागा यापैकी कोणत्याही ठिकाणी तीन गुंठे जागा उपलब्ध झाल्यास केंद्राचे काम सुरू करता येणार आहे. मात्र, पालिकेने पेशवे उद्यान पार्किंगमधिल एक गुंठा जागा दिली आहे. या जागेत सेंटर उभारणे शक्यच नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तीन गुंठे जागा मिळावी, असा प्रस्ताव महापालिकेला पाठविला असल्याचे. वनाज ते रामवाडी मार्गिका क्रमांक 2 चे प्रकल्प अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.