Sat, Jul 20, 2019 23:30होमपेज › Pune › महामेट्रोचा सिंगापूरच्या संस्थांबरोबर करार

महामेट्रोचा सिंगापूरच्या संस्थांबरोबर करार

Published On: Jan 11 2018 1:28AM | Last Updated: Jan 11 2018 12:20AM

बुकमार्क करा
पुणे : 

मेट्रोने प्रवास करणार्‍या नागरिकांचा प्रवास सोयीचा व्हावा, यासाठी वाहतुकीच्या विविध पर्यायांचा एकमेकांशी समन्वय साधण्याच्या कामी आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. सिंगापूरच्या ‘टेमासेक फाउंडेशन इंटरनॅशनल’ (टीएफआय) आणि ‘सिंगापूर को-ऑपरेशन एंटरप्राईज’ (एससीई) या संस्थांसह महामेट्रो आणि पुणे महापालिकेने एक करार केला आहे. सिंगापूरच्या या संस्थांनी पुण्यात तीन दिवसांच्या कार्यशाळेचेही आयोजन केले असून, त्याचे उद्घाटन करण्यात आले.  

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि ‘एससीई’चे प्रमुख कार्यकारी अधिकारी काँग वाय मून यांनी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. या कराराअंतर्गत वेगवेगळ्या पातळ्यांवर मनुष्यबळाचे प्रशिक्षण करणे प्रस्तावित आहे. सिंगापूरचे कौन्सल जनरल अजित सिंग, ‘सिंगापूर इंटरनॅशनल एंटरप्राईज’चे केंद्र संचालक गो केंग फांग, महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, सिंगापूर येथील भू-वाहतूक प्राधिकरणच्या सिस्टिम इंटरफेसचे संचालक हो कुम फाट, ‘एसएमआरटी इंटरनॅशनल’चे महाव्यवस्थापक मार्क एनजी, ‘एसएमआरटी ट्रेन्स’चे संचालक (कंट्रोल ऑपरेशन) येओ सिऊ वाह आदी या वेळी उपस्थित होते.

सिंगापूर येथील ‘टेमासेक फाउंडेशन इंटरनॅशनल’ ही संस्था आशिया खंडातील क्षमतावृद्धी उपक्रमांना आर्थिक साहाय्य करते, तर ‘सिंगापूर कोऑपरेशन एंटरप्राईज’ ही सिंगापूर सरकारची संस्था इतर देशांमध्ये होणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांबरोबर भागीदारी करू शकते. या दोन संस्थांनी ‘पुण्यातील नागरी वाहतूक आणि वाहतुकीसाठी विविध पर्यायांचा एकत्रितपणे वापर’ या विषयावर क्षमतावृद्धी कार्यक्रमाचा प्रस्ताव सादर केला आहे.     

महामेट्रो कॉर्पोरेशन, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, ‘पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरण’ (पीएमआरडीए), ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पीएमपीएमएल) आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांमधील 100 अधिकार्‍यांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. मेट्रोने प्रवास करणार्‍या नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी मेट्रोचा बस, रेल्वे आणि वाहतुकीच्या इतर साधनांशी समन्वय साधला जाईल अशी आखणी करण्यात येणार आहे.