होमपेज › Pune › टेकड्यांवर माफियाराज!

टेकड्यांवर माफियाराज!

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:39AMपुणे : दिगंबर दराडे 

पुणे जिल्हा प्रशासनाकडे असणारा यंत्रणेचा अभाव आणि होणार्‍या जुजबी कारवायांच्या पार्श्वभूमीवर, निर्ढावलेले माफिया सर्रासपणे टेकडीफोड करत असल्याचा प्रकार कात्रज घाटात उघडकीस आला आहे. कात्रज, शिंदेवाडी परिसरात दिवस-रात्र टेकडीफोड सुरू असून मनमानी पद्धतीने लचकेतोड करणारे माफिया मोकाट सुटले आहेत.

पर्यावरणाचे शत्रू कात्रज परिसरात मंजुरीपेक्षा जादा गौण खनिज उत्खनन आणि रात्रीच्या वेळी सातत्याने टेकड्यांची लचकेतोड करत आहेत. या मुळे प्रशासन मात्र हतबल असल्याचे चित्र सध्या आहे. निसर्गसंपदेचा गळा घोटून प्लॉटिंगसाठी सपाटीकरण आणि इमारतींसाठी टेकड्या फोडणार्‍यांवर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून करण्यात येत आहे.

झपाट्याने वाढणारे दक्षिण उपनगरातील नागरिकरण आता कात्रजचा घाट चढू लागले आहे. टेकड्यांच्या कवेत वसलेली भिलारेवाडी सोडली, तर गावठाण नसलेल्या कात्रज घाटातील, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभूळवाडी व कोळेवाडी भोवताली नजर टाकल्यानंतर गेल्या पाच वर्षांत अनेक ठिकाणी टेकड्यांना सुरूंग लागला आहे. जिल्हा प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी धडक कारवाई केली होती. प्रशासनाची पाठ फिरताच सावधगिरी बाळगून रात्रीच्या वेळी गौण खनिज उत्खनन आणि टेकडीफोड सुरू आहे. शिंदेवाडी दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने टेकड्यांसह घाट व घाटमाथा पालथा घातला आणि सर्वेक्षण केले. बेकायदा उत्खनन व टेकड्या फोडणार्‍यांवर कारवाया केल्या. अवघ्या दोन महिन्यांनंतर पुन्हा टेकडीफोड सुरू झाली. मात्र, सावध झालेल्या भांडवलदारांनी टेकडी फोडण्यासाठी रात्रीची वेळ निवडली. गेले वर्षभर हा प्रकार सुरू असूनही त्याकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 

या टेकडीफोडीने थेट शासनालाच आव्हान दिले आहे. काही टेकडीफोडीबाबत नागरिक तक्रार देतात, तेव्हा त्या उत्खननाला परवानगी असल्याची उत्तरे प्रशासनाकडून मिळत आहेत, त्यामुळे हे उत्खनन कायदेशीर आहे का, बेकायदा याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. याचाच गैरफायदा काही सराईत टेकडीफोड करणारे घेत आहेत. कात्रजमध्ये टेकडीफोडीमुळे शिंदेवाडीसारखी धोकादायक स्थिती उद्भवणारी ठिकाणे निर्माण होत आहेत. घाटमाथ्यावर प्लॉटिंगसाठी सपाटीकरण व घाटमार्गाच्या कडेला तट खोदून जागा निर्माण करून इमारती उभारल्या जात आहेत. बेकायदा बांधकाम प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ते करणे, आदी कारणांमुळे नैसर्गिक जलप्रवाह नष्ट झाले आहेत. परिणामी दर वर्षी पहिल्या पावसात कात्रज घाटात मोठमोठे दगड व माती रस्त्यावर वाहून येत आहेत. घाटातील वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रसंग भविष्यातील धोक्याचा इशारा देत आहेत.

..रात्रीस खेळ चाले

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून दिवस-रात्र टेकड्या फोडणे सुरूच आहे. सुरुवातीला टेकड्यांना कापून रस्ते तयार करण्यात आले. मग टेकड्या फोडून जमिनीचे सपाटीकरण करून, चार ते पाच मजली इमारतींचे काम सध्या सुरू आहे. विशेष बाब म्हणजे बांधकाम परिसरात संबंधित बांधकामांची माहिती देणारे फलकही लावलेले नाहीत. असे असतानाही टेकडीफोड, अवैध बांधकामे, प्लॉट बनवून, त्यांची विक्री कोणाच्या पूर्वपरवानगीने केली जाते, याचे उत्तर मिळत नाही. तर रात्रीस टेकडी फोडण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

स्वस्तात जागा आणि फ्लॅट

कात्रज गावाच्या तुलनेत गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, बालवडकर पाटील वस्ती परिसरात स्वस्तात जागा आणि फ्लॅट मिळत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही टेकडीफोड सुरू असून, येथे अवैध बांधकामेही जोरात सुरू आहेत.